CoronaVirus in Nagpur : १४ दिवसांची अग्निपरीक्षा संपली : तो रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:25 PM2020-03-26T23:25:26+5:302020-03-26T23:28:01+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाला. रुग्णालयातील १४ दिवस पूर्ण झाल्याने व तीनही नमुने निगेटिव्ह आल्याने गुरुवारी मेयोतून रुग्णवाहिकेने त्याला घरी सोडण्यात आले.

CoronaVirus in Nagpur : 14 days difficult ordeal ended: The patient was coronary-free | CoronaVirus in Nagpur : १४ दिवसांची अग्निपरीक्षा संपली : तो रुग्ण कोरोनामुक्त

CoronaVirus in Nagpur : १४ दिवसांची अग्निपरीक्षा संपली : तो रुग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देरुग्णालयातून घरी सोडले, वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाला. रुग्णालयातील १४ दिवस पूर्ण झाल्याने व तीनही नमुने निगेटिव्ह आल्याने गुरुवारी मेयोतून रुग्णवाहिकेने त्याला घरी सोडण्यात आले. कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास अग्निपरीक्षेचा होता. माझ्यातला आत्मविश्वास, डॉक्टरांचे प्रयत्न आणि आपल्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे मी घरी जात आहे, अशी भावनाही त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेत बसताना कोरोनामुक्त रुग्णाने सर्व डॉक्टरांचे, परिचारिकांचे व कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले. त्यांच्या सेवेला त्यांनी सलामही केला. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, विभागीय आयुक्त संजीव कुमार, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजीत बांगर, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे, औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोतमा रमेश पराते, डॉ. रवी चव्हाण व अनेक वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते. आपल्या रुग्णालयातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन जात असतानाचा उत्साह या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले ही ४५ वर्षीय व्यक्ती सहा मार्च रोजी नागपुरात आली. सर्दी, खोकला व ताप असल्याने ११ मार्च रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाली. त्याच दिवशी त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले. अहवालात त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मेयोच्या वॉर्ड क्रमांक २४ या आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले. डॉक्टरांनुसार, पहिल्या दिवशीपासून बाधित रुग्णाने उपचाराला सहकार्य केले. आमच्याकडून या आजाराची बारीकसारीक माहिती घेतली. काय करायला हवे, काय नको या सारखे अनेक प्रश्न विचारले. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने या दरम्यान त्यांनी पहिल्या दिवसांपासून धार्मिक ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी पॉझिटिव्ह आल्याने ते चिंतेतही होते. सात दिवसानंतर करण्यात आलेल्या चाचणीत ते निगेटिव्ह आले. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला होता. १४ दिवसांनंतर बुधवारी त्यांचे नमुने तपासले असता दुसरे नमुनेही निगेटिव्ह आले. २४ तासांनंतर पुन्हा नमुने तपासले असता गुरुवारी सकाळी नमुने निगेटिव्ह आले. त्यांना जेव्हा याची माहिती दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. देवासोबत डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले. डॉ. सागर पांडे यांनी सांगितले, पुढील १४ दिवस या कोरोनामुक्त व्यक्तीला सक्तीने घरीच थांबायचे आहे. दिवसातून दोन वेळा त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली जाणार आहे.
बंदिस्त जीवनाने खूप काही शिकविले
बाधित रुग्णाने ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, हे १४ दिवस म्हणजे अग्निपरीक्षाच होती. या बंदिस्त जीवनाने खूप काही शिकविले. जेव्हा पहिला नमुना पॉझिटिव्ह आला तेव्हा घाबरलो होतो. परंतु डॉक्टरांनी आणि घरच्या लोकांनी फोनवरून हिंमत बांधली. सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली. या दरम्यान धर्मग्रंथ वाचले. यामुळे नवी ऊर्जा मिळाली. पहिला नमुना निगेटिव्ह आल्यावर आत्मविश्वास वाढला. आता तर दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने घरी जात आहे. सलग १४ दिवसांनंतर मी आपल्या कुटुंबाला पाहणार आहे.

Web Title: CoronaVirus in Nagpur : 14 days difficult ordeal ended: The patient was coronary-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.