Coronavirus in Nagpur; स्मशान घाटावर राबताहेत दिवस-रात्र २०० कोरोना योद्धे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 07:44 AM2021-05-11T07:44:53+5:302021-05-11T07:45:56+5:30
Nagpur News आरोग्य सेवेतील कर्मचारी कोरोना योद्धा आहेतच. पण स्मशान घाटावर दिवस-रात्र राबणारे सफाई कर्मचारी खरे कोरोना योद्धा आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. शहरातील मृतांचा आकडा पाच हजाराच्या वर गेला आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर टीका होत असली तरी कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह आणण्यापासून तर अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडण्याची कौतुकास्पद कामगिरी मनपाचे सफार्ई कर्मचारी पार पाडत आहेत. यात झोनस्तरावरील कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. यासाठी तब्बल २०० कर्मचारी दिवस-रात्र राबताहेत. यातील ७० ते ८० सफाई कर्मचारी वर्षभरापासून हे सेवाकार्य करीत आहेत. आरोग्य सेवेतील कर्मचारी कोरोना योद्धा आहेतच. पण स्मशान घाटावर दिवस-रात्र राबणारे सफाई कर्मचारी खरे कोरोना योद्धा आहेत.
एप्रिल महिन्यात शहरातील दहनघाट व कब्रस्तानावर दररोज ३०० ते ४०० अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी घाटावर प्रतीक्षा करावी लागत होती. सकाळपासून तर रात्री १० ते ११ वाजेपर्यंत मनपाचे कर्मचारी अंत्यसंस्कार करीत होते. अजूनही परिस्थिती गंभीर आहे. मृतांचा आकडा काहीसा कमी झाला तरी घाटावरील गर्दी कायम आहे.
कोरोबा बाधितांचा मृत्यू झाल्यास संक्रमणाच्या भीतीमुळे रक्तातील नात्यातील लोक अंत्यसंस्कार करण्याचे टाळतात. पण आपला जीव धोक्यात घालून मनपाचे कर्मचारी ही जबाबदारी पार पाडत आहे. यासाठी ३० शववाहिका कार्यरत आहेत. झोनस्तरावरून याचे नियंत्रण केले जाते. बाधिताचा मृत्यू झाल्यास कोरोना वॉर रूमला याची माहिती मिळताच शववाहिका पाठविली जाते. रुग्णालय अथवा घरून मृतदेह घाटावर नेल्यानंतर अंत्यसंस्कारही पथकातील कर्मचाऱ्यांनाच करावे लागतात.
वर्षभरात जिल्ह्यात कोरोनामुळे झालेले मृत्यू - ८,१९३
कोरोनामुळे शहरात झालेले मृत्यू - ४,९५२
कोरोनामुळे ग्रामीणमध्ये झालेले मृत्यू - २,०६६
कोरोनामुळे जिल्ह्याबाहेरील मृत्यू - १,१७५
एका अंत्यसंस्काराला लागतात दोन तास
अंत्यसंस्कारासाठी १५ पथक गठित करण्यात आले आहेत. मृतदेह रुग्णालयातून घाटावर आणणे, त्यावर अंत्यसंस्कार करणे, या प्रक्रियेसाठी पथकाला दीड ते दोन तास लागतात. अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच दुसरा कॉल येतो. हा क्रम दिवसभर सुरू असतो. पीपीई किट घालून आठ ते दहा तास काम करावे लागत आहे.
बेवारस मृतदेहाचे हेच वारस
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यात अनेक बेवारस मृतांचा समावेश असतो. अशा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनाच करावे लागतात. बेवारस मृतदेहाचे आपणच वारस म्हणून पथकातील कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्कार करावे लागतात.