CoronaVirus in Nagpur : २०५ नवे, तर ३२५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:33 PM2020-11-09T22:33:40+5:302020-11-09T22:35:39+5:30
CoronaVirus, 205 new cases कोरोनाचा जोर ओसरू लागला आहे, तर दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सोमवारी २०५ नव्या रुग्णांची भर पडली असली तरी ३२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा जोर ओसरू लागला आहे, तर दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सोमवारी २०५ नव्या रुग्णांची भर पडली असली तरी ३२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बाधितांची एकूण संख्या १,०५,१४५ झाली असून ९८,६४२ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९३.६४ टक्क्यांवर पोहचले आहे. आज १० मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची एकूण संख्या ३,४८० झाली.
नागपूर जिल्ह्यात रविवारी चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. ११.१५ टक्के रुग्ण आढळून आले होते. सोमवारी चाचण्यांची संख्या कमी होती. मात्र, त्या तुलनेत बाधितांची संख्या कमी, ५.५५ टक्के होती. विशेष म्हणजे, आज १७०९ आरटीपीसीआर तर १९८० रॅपिड ॲन्टिजेन अशा एकूण ३,६८९ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. ॲन्टिजेन चाचणीत १६ तर आरटीपीसीआर चाचणीत १८९ बाधित रुग्ण आढळून आले. एम्स प्रयोगशाळेतून एक, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून २०, मेयोच्या प्रयोगशाळेतून १९, माफसूच्या प्रयोगशाळेतून ३७, नीरीच्या प्रयोगशाळेतून सहा, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून १४ तर खासगी लॅबमधून ९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
विविध रुग्णालयात १,१२६ रुग्ण
कोरोनाचा वेग कमी झाला असला तरी अद्यापही १,१२६ रुग्ण मेयो, मेडिकल व एम्ससह विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराखाली आहेत. सर्वाधिक २०१ रुग्ण मेडिकलमध्ये आहेत. ६३ रुग्ण मेयो तर २२ रुग्ण एम्समध्ये दाखल आहेत. तर २०७७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ३,६८९
बाधित रुग्ण : १,०५,१४५
बरे झालेले : ९८,६४२
उपचार घेत असलेले रुग्ण : ३,२०३
मृत्यू : ३,४८०