CoronaVirus in Nagpur : नागपुरात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह : २५ मे नंतर पहिल्यांदाच रुग्णांचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:16 AM2020-06-06T00:16:17+5:302020-06-06T00:17:31+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्याच्या कालावधीत नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद २५ मे रोजी झाली होती. या दिवशी ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६८२ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तीन महिन्याच्या कालावधीत नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद २५ मे रोजी झाली होती. या दिवशी ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ६८२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, हॉटस्पॉट ठरलेल्या नाईक तलाव येथून ३३ रुग्णांची नोंद झाली. धंतोली व सेमिनरी हिल्समध्येही कोरोनाचा शिरकाव झाला असून येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ४३ नमुने पॉझिटिव्ह आले. यात ३३ रुग्ण नाईक तलाव येथील आहेत. यात सर्वाधिक पुरुष रुग्ण असून लहान बालकांचाही यात समावेश आहे. हे सर्व रुग्ण पाचपावली क्वारंटाईन सेंटरमध्ये होते. मोमीनपुरा येथील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. गुरुवारी मध्य प्रदेशातील सारी रुग्णाचा मृत्यूनंतर त्याचा मुलगाही पॉझिटिव्ह आला आहे. या शिवाय, हिंगणा रोडवरील एक, लकडगंजमधील एक, बाजारगाव कोढाळी येथील एक तर सेमिनरी हिल्स येथील एक रुग्णाची नोंद झाली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील आठ रुग्ण मोमीनपुरा येथील तर दोन रुग्ण टिमकी येथील आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एक अमरावती येथील तर दुसरा रुग्ण गोंदिया येथील आहे. हे दोन्ही रुग्ण ‘सारी’ म्हणून भरती झाले असताना ते ‘कोविड पॉझिटिव्ह’ आले आहेत. खासगी प्रयोगशाळेतून धंतोली येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाला एम्समध्ये दाखल केले आहे. एम्समध्ये आज १६ रुग्ण भरती झाले असून रुग्णांची संख्या ४३ झाली आहे.
हॉटस्पॉट ठरलेल्या नाईक तलाव येथे ७९ रुग्ण
मोमीनपुरा, सतरंजीपुरा व टिमकी वसाहतीनंतर नाईक तलाव, बांगलादेश ही वसाहत हॉटस्पॉट झाली आहे. मोमीनपुरा येथे आतापर्यंत सर्वाधिक २३१ रुग्णाची नोंद झाली. सतरंजीपुरा वसाहतीत ११२ तर टिमकी वसाहतीत ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. आता टिमकी वसाहतीला मागे टाकून नाईक तलाव व बांगलादेश येथील आजच्या ३३ रुग्णांसह रुग्णांची संख्या ७९वर पोहचली आहे. येथून आणखी पॉझिटिव्ह रुग्ण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धंतोली, सेमिनरी हिल्स रुग्णाची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी
धंतोली येथील ४६ वर्षीय पुरुष काही दिवसापूर्वी दिल्ली येथून घरी परतले. गुरुवारी लक्षणे दिसून आल्याने एका खासगी प्रयोगशाळेत नमुना तपासला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पहिल्यांदाच धंतोली येथे रुग्णाची नोंद झाली आहे. मनपाने हा परिसर सील केल्याचे सांगण्यात येते. या शिवाय, सेमिनरी हिल्स येथील एका सोसायटीमधील ४० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. या महिलेचीही दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे. यांचे पती सैन्यात असल्याने त्यांनी गुरुवारी कामठी येथील सैन्याचा रुग्णालयात नमुना दिला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
सहा रुग्णांना रुग्णालयातून सुटी
मेयोमधून पाच तर मेडिकलमधून एका रुग्णाला सुटी देण्यात आली. यात मोमीनपुरा येथील २१वर्षीय महिला, टिपू सुलतान चौक येथील २७ वर्षीय पुरुष, सिरसपेठ येथील ५० वर्षीय महिला, याच वसाहतीतील ६४ वर्षीय पुरुष व बजेरिया येथील १६ वर्षीय युवतीचा समावेश आहे. या रुग्णांनी पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन राहणार असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे, तर मेडिकलमधून पश्चिम बंगाल येथून एका महिला रुग्णाला सुटी देण्यात आली. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ४२३ झाली आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १६६
दैनिक तपासणी नमुने ४७६
दैनिक निगेटिव्ह नमुने १२१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६८२
नागपुरातील मृत्यू १३
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४२३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २९९४
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १६८२
पीडित-६८२-दुरुस्त-४२३-मृत्यू-१३