CoronaVirus in Nagpur : ७० वर्षीय वृद्धही कोरोनाच्या विळख्यात, आणखी ११ पॉझिटिव्हची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:00 PM2020-04-21T23:00:50+5:302020-04-21T23:47:45+5:30
कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) सर्वाधिक धोका हा वयस्कर व्यक्तींना असल्याचे सांगितले जाते. नागपुरात मंगळवारी नोंद झालेल्या ११ रुग्णात चार वृद्ध आहेत. यातील एकाचे वय ७० आहे. आतापर्यंत नोंद झालेल्यांमध्ये हे सर्वात वयोवृद्ध रुग्ण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) सर्वाधिक धोका हा वयस्कर व्यक्तींना असल्याचे सांगितले जाते. नागपुरात मंगळवारी नोंद झालेल्या ११ रुग्णात चार वृद्ध आहेत. यातील एकाचे वय ७० आहे. आतापर्यंत नोंद झालेल्यांमध्ये हे सर्वात वयोवृद्ध रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे, नव्या रुग्णामध्ये आणखी एक गर्भवती, दोन व तीन वर्षाच्या चिमुकल्यांचाही समावेश आहे. या रुग्णासह नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२ झाली आहे.
ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकाकडून सतरंजीपुऱ्यातील मृत व त्याच्या नातेवाईंकाकडून इतरांना लागण झालेले रुग्ण मंगळवारीही आढळून आले. या ११ रुग्णामधून नऊ रुग्ण सतरंजीपुऱ्यातील तर दोन रुग्ण मोमीनपुऱ्यातील आहेत. सतरंजीपुरा संपर्कातील रुग्णांची संख्या आता ५४ झाली आहे. आणखी १३२ संशयितांच्या नमुन्यांचा तपासणीचा अहवाल प्रलंबित आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे सर्व नमुने तातडीने तपासणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
मेयोच्या प्रयोगशाळेतून सात पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये दोन वर्षीय मुलगा, तीन वर्षीय मुलगी व ३१ वर्षीय त्याची आई आहे. सतरंजीपुरात राहणाऱ्या या कुटुंबाला २० एप्रिल रोजी वनामती येथे क्वारंटाइन करण्यात आले होते. या शिवाय, ७० वर्षीय वृद्ध पुरुष, ६५वर्षीय महिला हे मोमीनपुऱ्यातील रहिवासी आहे. २० वर्षीय गर्भवती व १७ वर्षीय युवती सतरंजीपुऱ्यातील रहिवासी आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेत २४ वर्षीय युवती, २० वर्षीय युवक व ६६वर्षीय पुरुषाचे नमुने पॉझिटिव्ह आले. हे तिघेही सतरंजीपुऱ्यातील रहिवासी आहेत. गेल्या सहा दिवसापासून ते आमदार निवासात क्वारंटाइन होते. एम्स प्रयोगशाळेत ६० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. या सुद्धा सतरंजीपुऱ्यातील असून ८ एप्रिलपासून लोणारा येथे क्वारंटाइन आहेत. यांचा दुसरा नमुना पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येते. या सर्वांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले आहे.
दोन गर्भवती कोरोनाबाधित
१८ एप्रिल रोजी नऊ महिन्याच्या गर्भवतीचे नमुने पॉझिटिव्ह आले. तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी पुन्हा तीन महिन्याची २१ वर्षीय गर्भवतीचे नमुने पॉझिटिव्ह आले. या दोन्ही गर्भवतीकडे डॉक्टर विशेष लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, यांच्यासाठी स्वतंत्र प्रसुती कक्ष तयार केला जाणार आहे.
मेयोमध्ये ४० तर मेडिकलमध्ये ३८ बाधित
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयात (मेडिकल) वॉर्ड क्र. २५, वॉर्ड क्र.४९ व पेईंग वॉर्ड रुग्णांसाठी कोरोनाबाधित व संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सध्या मेडिकलमध्ये ३८ रुग्ण दाखल आहेत. मेयोमध्ये वॉर्ड क्र. २४, वॉर्ड क्र. ४, ५ व ६ आहेत. येथे ४० रुग्ण असून एकूण ७८ रुग्ण उपचाराला आहेत. १२ रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ३९
दैनिक तपासणी नमुने ३७
दैनिक निगेटिव्ह नमुने २८
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९२
नागपुरातील मृत्यू १
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ११४१
क्वारंटाइन कक्षात एकूण संशयित ५३८