CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा एक पॉझिटिव्ह : कोरोनाबाधितांची संख्या ५९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:14 PM2020-04-17T23:14:55+5:302020-04-17T23:15:57+5:30
कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. शुक्रवारी आणखी एक ३० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला.या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या ५९ झाली. यातील ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. शुक्रवारी आणखी एक ३० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला. शांतिनगर येथील रहिवासी असलेला हा रुग्ण सतरंजीपुऱ्यातील मृताचा नातेवाईक आहे. लोणारा अलगीकरण कक्षात हा रुग्ण १० एप्रिलपासून दाखल होता. या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या ५९ झाली. यातील ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नागपुरातील पहिल्या कोरोना मृताकडून बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सतरंजीपुऱ्यातील ६८ वर्षीय पुरुष मृताकडून व त्यांच्या नातेवाईकाकडून आतापर्यंत सुमारे २२ वर संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा या मृताचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते. १० एप्रिल रोजी या रुग्णाला लोणारा येथील अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्याचा पहिला नमुना निगेटिव्ह आला. पाचव्या दिवसानंतर या रुग्णाचा पुन्हा नमुना तपासणीसाठी मेयोला पाठविण्यात आला. यात तो पॉझिटिव्ह आला. या रुग्णावर पुढील उपचारासाठी अलगीकरण कक्षातून मेयोमध्ये पाठविले आहे.
१९७ मधून १९२ नमुने निगेटिव्ह
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) ८३ नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील ५८ तर अमरावती जिल्ह्यातील २५ नमुन्यांचा समावेश होता. अमरावतीमधील चार नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित ७९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. मेयो प्रयोगशाळेने ६५ नमुने तपासले, यात ५२ नमुने आमदार निवास, उर्वरित १३ नमुन्यांमधून काही मेयो व भंडारा जिल्ह्यातील होते. यातील एक नमुना पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित ६४ नमुने निगेटिव्ह आले. मेडिकलने ४९ नमुने तपासले. या नमुन्यांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. एकूण १९७ नमुन्यांमधून १९२ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
अलगीकरण कक्षात ४० संशयितांची भर
वनामती, आमदार निवास, रविभवन, लोणारा व सिम्बायोसिस या पाच संस्थांत्मक अलगीकरणात आणखी ४० संशयितांची भर पडली. तर ५३ संशयितांचे दुसरे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. सध्या या पाचही ठिकाणी मिळून ५४५ संशयित भरती आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ६१
दैनिक तपासणी नमुने १९७
दैनिक निगेटिव्ह नमुने १९२
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५९
नागपुरातील मृत्यू १
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १०७१
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित ५४५