CoronaVirus in Nagpur : दिलासादायक, दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:09 PM2021-05-11T23:09:44+5:302021-05-11T23:11:01+5:30
CoronaVirus , decrease in the number of patients फेब्रुवारी महिन्यापासून दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येत आता घट दिसून येऊ लागली आहे. सलग १२ दिवसांपासून रुग्णसंख्येचा वेग ओसरत आहे. मंगळवारी २,२४३ नव्या रुग्णांची नोंद झाली व ६५ रुग्णांचा बळी गेला. रुग्णांची एकूण संख्या ४,५३,८४८ झाली असून मृतांची संख्या ८,२५८ वर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फेब्रुवारी महिन्यापासून दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येत आता घट दिसून येऊ लागली आहे. सलग १२ दिवसांपासून रुग्णसंख्येचा वेग ओसरत आहे. मंगळवारी २,२४३ नव्या रुग्णांची नोंद झाली व ६५ रुग्णांचा बळी गेला. रुग्णांची एकूण संख्या ४,५३,८४८ झाली असून मृतांची संख्या ८,२५८ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दरही वाढला आहे. मंगळवारी तो ८७ टक्क्यांवर गेल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपूर जिल्ह्यात अडीच महिन्यांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, १७ दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. ७,९९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या कमी कमी होऊ लागली. मात्र, मागील तीन दिवसांपासून चाचण्यांच्या संख्येत घट झाल्यानेच रुग्णसंख्येत घट तर झालेली नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. रविवारी झालेल्या १४,४६४ चाचण्यांमध्ये ११,४५१ आरटीपीसीआर तर ३०१३ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून १८८४ तर अँटिजनमधून ३५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
शहरात १३६३ तर, ग्रामीणमध्ये ८६६ रुग्ण
शहरात आज ९,७६८ चाचण्या झाल्या यातून १३६३ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. ३२ मृत्यूची नोंद झाली. ग्रामीणमध्ये ४,६९६ चाचण्या झाल्या. यात ८६६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, १९ रुग्णांचे बळी गेले. इतर जिल्ह्यातील १४ रुग्ण व १४ मृत्यूची नोंद झाली. धक्कादायक म्हणजे, जिल्ह्याबाहेरील १३७१ रुग्णांचे नागपुरात मृत्यू झाले आहेत.
कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १४,४६४
ए. बाधित रुग्ण : ४,५३,८४८
सक्रिय रुग्ण : ४६,५९६
बरे झालेले रुग्ण : ३,९८,९९४
ए. मृत्यू : ८,२५८