CoronaVirus in Nagpur : दिलासा; नव्या बाधितांसह मृत्यूंमध्येदेखील घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:45 PM2021-05-03T23:45:31+5:302021-05-03T23:47:40+5:30
CoronaVirus, Decreases in deaths with new infections मागील काही दिवसांपासून सुरू असलेला कोरोना वाढीचा चढता आलेख आता काहीसा उतरू लागला आहे. मागील तीन दिवसांत नवीन बाधितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सोमवारी नव्या बाधितांसह मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतदेखील घट आली. जिल्ह्यातील रिकव्हरीचा दर ८१.१२ टक्के इतका आहे. अशाच पद्धतीने संसर्ग कमी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला कोरोना वाढीचा चढता आलेख आता काहीसा उतरू लागला आहे. मागील तीन दिवसांत नवीन बाधितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सोमवारी नव्या बाधितांसह मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतदेखील घट आली. जिल्ह्यातील रिकव्हरीचा दर ८१.१२ टक्के इतका आहे. अशाच पद्धतीने संसर्ग कमी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात ४ हजार ९८७ नवीन रुग्ण आढळले. यातील ३ हजार १६१ शहरातील, तर १ हजार ८१४ ग्रामीण भागातील होते, तर ७६ लोकांचा मृत्यू झाला. यात शहरातील ४८, ग्रामीणमधील १६ व जिल्ह्याबाहेरील १२ जणांचा समावेश होता. जवळपास २६ दिवसांनंतर जिल्ह्यात पाच हजारांहून कमी बाधित आढळले, तर १५ दिवसांनंतर ८० हून कमी मृत्यूची संख्या नोंदविली गेली.
मसोवारी ६ हजार ६०१ रुग्ण ठणठणीत झाले. यातील ४ हजार ५९६ शहरातील, तर २ हजार ५ ग्रामीण भागातील होते.
ग्रामीणमध्ये चिंता कायम
२४ तासात २० हजार १७८ नमुन्यांची तपासणी केली. यात शहरातील १६ हजार ७२६ व ग्रामीणमधील ३ हजार ५४२ नमुने होते. आतापर्यंत जिल्ह्यात २३ लाख ३७ हजार ९८१ नमुन्यांची तपासणी केली आहे. ग्रामीणमधील एकूण नमुन्यांपैकी १ हजार ८१४ नमुने पॉझिटिव्ह आढळले. एकूण नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याची टक्केवारी ५२.५४ इतकी आहे. याचाच अर्थ चाचणी करणाऱ्या दोघांपैकी एक बाधित आढळत आहे. ग्रामीणमध्ये चाचण्यांची संख्यादेखील घटली आहे.
७२ हजार सक्रिय रुग्ण
सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२ हजार ४३७ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ५८ हजार ७८४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून १३ हजार ६५३ रुग्ण विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत दाखल आहेत.
मे महिन्यातील संसर्ग
दिनांक – नवे बाधित – मृत्यू – ठीक
१ मे – ६,५६७ – ९९ – ७,५७५
२ मे – ५,००७ – ११२ – ६,३७६
३ मे – ४,९८७ – ७६ – ६,६०१