कोरोना मृत्यूच्या आकड्यांचा घोळ ; मनपा आयुक्तांनी अहवाल मागितला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 08:00 AM2021-04-30T08:00:00+5:302021-04-30T08:00:15+5:30
Coronavirus in Nagpur प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याचा विचार करता, जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या तिप्पट अंतिम संस्कार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी चौकशी अहवाल मागितला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिल महिन्यात कोरोना प्रकोपामुळे नागपूर शहरातील मृतकांची संख्या वाढली आहे. मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याचा विचार करता, जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या तिप्पट अंतिम संस्कार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी चौकशी अहवाल मागितला आहे. मृतकांच्या आकडेवारीची मनपा प्रशासनाकडून शहानिशा केली जात आहे.
सोमवारी जिल्ह्यात ८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील ५४, ग्रामीणमधील २५, तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश होता. परंतु शहरातील १४ घाटांवर सोमवारी तब्बल ३९२ मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २८८ इतकी आहे, तर १०४ नॉनकोविड मृत्यूची नोंद घाटावर करण्यात आल्याचे लोकमत चमूने केलेल्या रियालिटी चेकमध्ये आढळून आले होते. दररोजचे वास्तव असेच आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच मनपा प्रशासनात खळबळ उडाली. याची दखल घेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांना दिले आहे.
नागपूर शहरात दुसऱ्या जिल्ह्यातील रूग्णांवर उपचार सुरू असताना मृत्यू होतात. त्यांच्यावर नागपुरातच अंतिम संस्कार केले जातात. यामुळे आकडेवारीत तफावत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु मनपा प्रशासनाकडून दररोज कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जाहीर केली जाते. यात नागपूर शहर, ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील रूग्णांचा समावेश असतो. याचा विचार करता घाटावरील आकडे व जाहीर करण्यात येणारे आकडे यात घोळ असल्याचे दिसून येते.
चौकशीचे आदेश दिले आहे
नागपूर शहरातील रूग्णालयात बाहेरील जिल्ह्यातील रूग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. यादरम्यान काहींचा मृत्यू झाल्यास त्यांची नोंद होत नाही. यामुळे घाटावर करण्यात येणारे अंतिम संस्कार व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंद यात तफावत असू शकते. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. अहवालानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
राधाकृष्णन बी., आयुक्त महापालिका
काही अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी
सर्व मृतकांवर त्याच दिवशी अंतिम संस्कार होत नाही. काही जणांवर दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार केले जातात. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंद व घाटावरील अंतिम संस्कार यात तफावत असू शकते.
दयाशंकर तिवारी, महापौर
आकड्यात तफावत दिसते
कोरोनामुळे होणारे मृत्यू व घाटावर करण्यात येणारे अंतिम संस्कार यात मोठी तफावत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडून माहिती मागवून शहानिशा केली जाईल. परंतु कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूची नोंद व घाटावर होणारे अंतिम संस्कार यात मोठी तफावत दिसत आहे. वास्तव पुढे आले पाहिजे.
प्रकाश भोयर, अध्यक्ष स्थायी समिती मनपा
...