CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 08:15 PM2020-03-30T20:15:40+5:302020-03-30T20:17:14+5:30
एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्वांनाच अहवालाची प्रतीक्षा आहे. आज दिवसभरात एका कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी व मुलगा पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णासह नागपुरात रुग्णाची संख्या १६ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील ५५ वर्षीय व्यक्ती गेल्या पाच दिवसांपासून नागपूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होता. डॉक्टरानुसार रुग्णाला सर्दी, खोकला व दम लागत होता. त्याचे सिटिस्कन केले असता न्युमोनिया असल्याचे दिसून आले. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व न्युमोनिया रुग्णांची चाचणी करण्याचा सूचना आहेत. त्यानुसार या रुग्णाच्या चाचणीसाठी सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेयोला आणले. रुग्णाला वॉर्ड क्र. ४ मध्ये दाखल करण्यात आले. परंतु दोन तासातच त्याचा मृत्यू झाला. कोरोना संशयित रुग्णाच्या मृत्यूने सर्वांनाच नमुन्याचा काय अहवाल येतो, याची प्रतीक्षा लागली आहे.
आठ डॉक्टर, चार पॅरामेडिकल स्टाफ संशयित
सोमवारी पहाटे दोन रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले. हे रुग्ण दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या बाधित रुग्णाच्या छोट्या भावाची ३२ वर्षीय पत्नी आणि ११ वर्षीय मुलगा आहे. पॅरालिसीसच्या उपचारासाठी आलेल्या या रुग्णाने भाऊ पॉझिटिव्ह असल्याची बाब डॉक्टरांपासून लपवून ठेवली होती. यामुळे त्याच्या संपर्कात आलेले मेडिकलच्या आठ डॉक्टरांसह चार पॅरामेडिकल स्टाफला कोरोना संशयित म्हणून ‘होम क्वारंटाइन’ केले.
३२ नमुने निगेटिव्ह
२९ मार्च रोजी पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबासह इतर नातेवाईक व मित्र व शेजारचे मिळून असे ३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर आज दिवसभरात मेडिकलमध्ये ६४ तर मेयोमध्ये ३२ असे एकूण ९५ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.