CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा कहर : मृत्यूचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:08 PM2020-08-25T22:08:33+5:302020-08-25T22:12:39+5:30

सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

CoronaVirus in Nagpur: Corona virus in Nagpur: Half a century of death | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा कहर : मृत्यूचे अर्धशतक

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा कहर : मृत्यूचे अर्धशतक

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णसंख्येचा उच्चांक : १,०७१ पॉझिटिव्ह५२ बळीदिलासादायक, १०३६ रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या २२,२२५ तर मृतांची संख्या ८१४ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, हजारावर रुग्ण बाधित आढळून आले असले तरी १०३६ रुग्ण बरे झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यात कालपर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद दोन दिवसांपूर्वी, रविवारी झाली. ४६ मृत्यू झाले होते. परंतु आज मृत्यूसंख्येने नवा विक्रम गाठला. वाढत्या मृत्यू व रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आज मेयोमध्ये १७ तर मेडिकलमध्ये १२ रुग्णांचे मृत्यू झाले. यात भंडारा येथील ५९ वर्षीय पुरुष, कामठी रोड येथील ५३ वर्षीय महिला, सुगत नगर येथील ७३ वर्षीय पुरुष, आदिवासी ले-आऊट वडधामना येथील ६८ वर्षीय पुरुष, झिंगाबाई टाकळी येथील ४७ वर्षीय पुरुष, नवीन खलासी लाईन कामठी येथील ६४ वर्षीय महिला, पटवर्धन अपार्टमेंट सीताबर्डी येथील ४७ वर्षीय पुरुष, सावित्री बाई फुले स्लम वसाहत पार्वतीनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, बहादुरा दिघोरी येथील एक रुग्ण, धंतोली येथील ९५ वर्षीय महिला, सावनेर येथील ६३ वर्षीय महिला व ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. उर्वरित मृतांची माहिती उपलब्ध झाली नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये ४६ शहरातील, चार ग्रामीण भागातील तर दोन जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापर्यंत शहरात ६१३, ग्रामीणमध्ये ११५ तर जिल्हाबाहेर ८६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

अर्धे रुग्ण खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अर्धे रुग्ण खासगी लॅबमधील आहेत. ४५३ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. अ‍ॅन्टिजेन चाचणीत २११ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले, तर आरटीपीसीआर चाचणीत एम्समध्ये १३१, मेडिकलमध्ये ५९, मेयोमध्ये १५९, नीरीमध्ये ५८ अशा एकूण १,०७१ रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, १७६१ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली.

बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८ टक्क्यांवर
दिलासादायक म्हणजे, मागील आठवड्यात कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्क्यांवर गेले असताना आज ते ५८.७९ टक्क्यांवर पोहचले आहे. १,०३६ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या १३,०६८ वर पोहचली आहे. यात शहरातील ९,२०६ तर ग्रामीण भागातील ३,८६२ रुग्ण आहेत. सध्याच्या स्थितीत ८,३४३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात शहरातील ६,६४२ तर ग्रामीणमधील १७०१ रुग्ण आहेत.

दैनिक संशयित : ५,७६४
बाधित रुग्ण : २२,२२५
बरे झालेले : १३,०६८
उपचार घेत असलेले रुग्ण : ८,३४३
मृत्यू : ८१४

Web Title: CoronaVirus in Nagpur: Corona virus in Nagpur: Half a century of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.