CoronaVirus in Nagpur : नागपुरात सध्यातरी कोरोनासाठी ३७० खाटा, ८ व्हेंटिलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:22 PM2020-03-31T23:22:12+5:302020-03-31T23:25:17+5:30
कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या नागपुरात १६ झाली आहे. या रुग्णांसाठी सध्यातरी मेडिकलमध्ये ९० खाटा, ४ व्हेंटिलेटर, मेयोमध्ये ८० खाटा, ४ व्हेंटिलेटर, डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १० खाटा तर रेल्वे हॉस्पिटलकडे १९० अशा एकूण ३७० खाटा उपलब्ध आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या नागपुरात १६ झाली आहे. या रुग्णांसाठी सध्यातरी मेडिकलमध्ये ९० खाटा, ४ व्हेंटिलेटर, मेयोमध्ये ८० खाटा, ४ व्हेंटिलेटर, डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १० खाटा तर रेल्वे हॉस्पिटलकडे १९० अशा एकूण ३७० खाटा उपलब्ध आहेत. परंतु लवकरच मेयो, मेडिकलमध्ये १२०० तर लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ३६३ खाटांची सोय केली जाणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा या तिसऱ्या टप्प्यात रुग्ण संख्या वाढतानाही दिसून येत आहे. एकूण कोरोना रुग्णाच्या संख्येत देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या शहरात नागपूर पाचमध्ये आहे. यामुळे नियोजनाच्या दृष्टीने वेगाने पावले उचलली जात आहे. शासनाने कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी मेयो, मेडिकलला ३५ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. यातील २५ कोटी उपलब्धही करून दिले आहेत. या निधीतून मेडिकलमध्ये २०० खाटांचे अतिदक्षात विभाग (आयसीयू) व ४०० खाटांचे ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) होणार आहे. मेयोमध्ये १६० खाटांचे आयसीयू व ४४० खाटांचे ‘एचडीयू’ होणार आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलने तूर्तास १० खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. परंतु लवकरच ३५० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड, १३ खाटांचे ‘एचडीयू’ तर १० खाटांचे ‘आयसीयू’ असणार आहे. या शिवाय रेल्वेच्या अजनी हॉस्पिटलमध्ये ४० व आरपीएफ बॅरेकमध्ये १५० असे एकूण १९० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार करून ठेवण्यात आला आहे. एकूणच नागपुरात कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी १७६३ खाटा असणार आहे. परंतु या क्षणी नागपुरात केवळ मेयो, मेडिकल, लता मंगेशकर व रेल्वेचे हॉस्पिटल मिळून ३७० खाटा व ८ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. महानगरपालिकेने व खासगी हॉस्पिटलने अद्यापही आपल्या रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपारासाठी तयारी दाखविली नाही, हे विशेष. मेयो, मेडिकलमध्ये सध्याची स्थिती
मेयोमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी २० खाटांच्या स्वतंत्र वॉर्डासह संशयित रुग्णांसाठी २०-२० खाटांचे तीन वॉर्ड मिळून ८० खाटा आहेत. सध्या येथे ३० संशयित तर नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये बाधित रुग्णांसाठी ४० खाटांच्या वॉर्डसह संशयित रुग्णांसाठी ३० व २० खाटांचे दोन वॉर्ड मिळून एकूण ९० खाटा आहेत. सध्या २५ संशयित व ३ पॉझिटिव्ह रुग्ण भरती आहेत. दोन्ही रुग्णालयात रुग्णांसाठी सध्याच्या स्थितीत चार-चार व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.