CoronaVirus in Nagpur : चाचण्या व रुग्णसंख्येतही घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 09:29 PM2020-12-21T21:29:38+5:302020-12-21T21:31:06+5:30
Coronavirus, nagpur newsमागील दहा दिवसांतील सर्वात कमी चाचण्यांची नोंद सोमवारी झाली. परिणामी, दैनंदिन रुग्णसंख्येतही घट दिसून आली. आज २३५ नव्या रुग्णांची भर पडली तर ८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १२०२८७ झाली असून मृतांची संख्या ३८५७वर पोहचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्टेन) आढळून आल्याने राज्यात खबरदारी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात अधिकची सतर्कता बाळगली जात आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांना घेऊन आरोग्य यंत्रणा गंभीर नसल्याचे चित्र आहे. मागील दहा दिवसांतील सर्वात कमी चाचण्यांची नोंद सोमवारी झाली. परिणामी, दैनंदिन रुग्णसंख्येतही घट दिसून आली. आज २३५ नव्या रुग्णांची भर पडली तर ८ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १२०२८७ झाली असून मृतांची संख्या ३८५७वर पोहचली.
कोरोना विषाणूचा नवीन प्रकारामुळे पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. परंतु सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत झालेली वाढ यामुळे खबरदारी न बाळगल्यास आजार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर जिल्ह्यात आज २८५७ आरटीपीसीआर, ६६१ रॅपिड अँटिजेन अशास एकूण ३५१८ चाचण्या झाल्या. मागील दहा दिवसांतील सर्वात कमी चाचण्या आहेत. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसांपासून दैनंदिन चाचण्यांची संख्या पाच हजाराखाली आली आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये शहरातील १९६, ग्रामीणमधील ३६ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील २ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
बाधितांच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे
सोमवारी बाधितांच्या तुलनेत अधिक, ३२४ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,१०,३९७ झाली असून हा दर ९१.७८ टक्क्यांवर पोहचला आहे. ६०३३ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १२३३ विविध रुग्णालयांमध्ये तर ४८०१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये आहेत. १४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मेयोमध्ये ७० तर एम्समध्ये ४१ रुग्ण आहेत. उर्वरीत रुग्ण खासगी रुग्णालयात आहे.
दैनिक संशयित : ३५१८
बाधित रुग्ण : १२०२८७
बरे झालेले : ११०३९७
उपचार घेत असलेले रुग्ण : ६०३३
मृत्यू : ३८५७