CoronaVirus in Nagpur : नऊ महिन्याच्या गर्भवतीसह चार पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 01:14 AM2020-04-19T01:14:26+5:302020-04-19T01:15:15+5:30
नऊ महिन्याच्या गर्भवतीला कोरोना विषाणूची लागण झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपुरातील हे पहिलेच प्रकरण आहे. या महिलेसह आणखी चौघे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नऊ महिन्याच्या गर्भवतीला कोरोना विषाणूची लागण झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपुरातील हे पहिलेच प्रकरण आहे. या महिलेसह आणखी चौघे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली आहे. गर्भवतीसह तिघे सतरंजीपुऱ्यातील तर एक मोमिनपुऱ्यातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. नागपुरात या आठवड्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. १२ ते १८ एप्रिल या सात दिवसात ३६ संशयितांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आतापर्यंत निदान झालेल्या रुग्णांमध्ये २० ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, नागपुरात कोरोनाचा पहिल्या बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मृताच्या व त्यांच्या नातेवाईकाच्या संपर्कात आलेले साधारण २५ वर रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी नोंद झालेल्या चार रुग्णांपैकी तीन रुग्ण याच मृताच्या वसाहतीतील आहेत. नऊ महिन्याची गर्भवती महिला आणि तिचा २९ वर्षीय पती मृताच्या घराच्या शेजारी राहतात. या दोन घरामधील दरवाजामधील अंतर पाच फुटापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येते. या जोडप्याला दोन वर्षाची मुलगी आहे. यांच्यासह सात जणांना १६ एप्रिल रोजी आमदार निवासातील अलगीकरण कक्षात दाखल केले होते. याच दिवशी यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले असता पती, पत्नीचा नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोघांना मेडिकलमध्ये दाखल केले आहे. गर्भवती महिलेची विशेष काळजी घेतली जात असून, तिला मे महिन्याची प्रसूतीची तारीख दिली आहे. उर्वरित दोनमधील एक सतरंजीपुºयातीलच ३० वर्षीय पुरुष आहे. तो कोरोनाबाधित मृताच्या संपर्कातील आहे, तर दुसरा ४२ वर्षीय रुग्ण हा मोमिनपुºयातील रहिवासी आहे. ४ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आलेला मोमिनपुºयातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. या दोघांना मेयोमध्ये दाखल केले आहे. नागपुरात आतापर्यंत १२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.
१७९ नमुने निगेटिव्ह
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यातील ६० नमुने तपासले. यात अमरावतीमधील एक नमुना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५९ नमुने निगेटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेत ६५ नमुने तपासण्यात आले. यात आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षातील ५० नमुन्यांचा समावेश होता. यातील चार पॉझिटिव्ह नमुने वगळता ६१ नमुने निगेटिव्ह आले. मेडिकलने ६० नमुने तपासले, यातील एक नमुना पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आला. उर्वरित ५९ नमुने निगेटिव्ह आले. आज दिवसभरात एकूण १८५ नमुने तपासण्यात आले, यातील १७९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ८६
दैनिक तपासणी नमुने १८५
दैनिक निगेटिव्ह नमुने १७९
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ६३
नागपुरातील मृत्यू १
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १०७५
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित ५८२