Coronavirus in Nagpur; नागपूर शहराचा संसर्गदर २० टक्क्यांहून खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 09:02 AM2021-05-06T09:02:42+5:302021-05-06T09:04:00+5:30
Nagpur News Coronavirus एप्रिल महिन्यात नागपूर जिल्ह्यात चाचणीसाठी आलेल्यांपैकी २७.८९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले होते. मेमध्ये हीच टक्केवारी २४.३८ टक्क्यांवर आली आहे. शहरातील संसर्गाची टक्केवारी २० टक्क्यांहून खाली आली आहे.
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर – मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच दिवसांपासून सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ५९० ने घटली आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत दररोज बरे होणाऱ्यांची संख्या दोन हजारांनी अधिक आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात चाचणीसाठी आलेल्यांपैकी २७.८९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले होते. मेमध्ये हीच टक्केवारी २४.३८ टक्क्यांवर आली आहे. शहरातील संसर्गाची टक्केवारी २० टक्क्यांहून खाली आली आहे.
शहर व ग्रामीण भागात आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह व तपासणी करण्यात आलेल्या एकूण नमुन्यांचा अभ्यास केला असता शहरातील संसर्गाचा दर ग्रामीणहून अर्धा झाला आहे. मेच्या पहिल्या पाच दिवसांत शहरात १५ हजार २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले व ७८ हजार ३६७ नमुने तपासले गेले. तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १९.१४ टक्के नमुने पॉझिटिव्ह होते. दुसरीकडे ग्रामीणमध्ये या कालावधीत २४ हजार ७७९ नमुने तपासण्यात आले व त्यातील १० हजार ८९ पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीणमधील बाधितांची टक्केवारी ४०.७१ टक्के इतकी होती. नागपूर शहरात संसर्गाचा वेग कमी झाला असून, ग्रामीणमध्ये मात्र चिंता कायम आहे.
रिकव्हरीची टक्केवारी वाढली
३० एप्रिल रोजी जिल्ह्यात ७६ हजार ७०६ सक्रिय रुग्ण होते. आता ती संख्या ६६ हजार ११६ वर पोहोचली आहे. रिकव्हरीची टक्केवारी ७९.३८ टक्क्यांहून ८२.९२ टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात मे महिन्याच्या पाच दिवसांत २५ हजार १५२ नवीन रुग्ण आढळले, तर ३५ हजार ३०१ रुग्ण बरे झाले. या कालावधीत १ लाख ३ हजार १४६ नमुने तपासण्यात आले. मात्र, मृत्यूचा आकडे चिंताजनक असून, पाच दिवसांत ४४० लोकांचा मृत्यू झाला.
पाच दिवसांतील आकडेवारी
भाग – पॉझिटिव्ह – नमुने – बाधितांची टक्केवारी
शहर – १५,००२ – ७८,३६७ – १९.१४ %
ग्रामीण – १०,०८९ – २४,७७९ – ४०.७१ %