Coronavirus in Nagpur; म्युकरमायकोसिसवरील औषध मिळेना, रुग्णसेवा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 08:04 AM2021-05-15T08:04:34+5:302021-05-15T08:07:13+5:30
Nagpur News कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला समोरा जावे लागत आहे. या आजाराची आरोग्य विभागाकडे नोंद नाही. परंतु शासकीय व खासगी रुग्णालये मिळून जवळपास २०० वर रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी नावाच्या आजाराला समोरा जावे लागत आहे. अनियंत्रित मधुमेह व स्टेराईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार वाढत आहे. या आजाराची आरोग्य विभागाकडे नोंद नाही. परंतु शासकीय व खासगी रुग्णालये मिळून जवळपास २०० वर रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे. सध्याच्या स्थितीत बाजारात या आजारावरील औषधे मिळेनाशी झाली आहेत. परिणामी, काळा बाजारात दुप्पट ते तिप्पट किमतीत औषधे विकली जात आहे.
कोरोना विषाणूवर यशस्वी उपचारानंतर ‘म्युकरमायकोसिस’ सारख्या आजाराची गुंतागुंत वाढत असल्याने आरोग्य क्षेत्रात चिंता वाढली आहे. ‘म्युकरमायकोसिस’हे फंगल इन्फेक्शन आहे. या आजारावर औषधे, शस्त्रक्रिया आणि मधुमेहासारख्या मूलभूत जोखीम घटकांचे त्वरित नियंत्रण करणे गरजेचे ठरते. डॉक्टरांनुसार इंजेक्टेबल औषधे ‘लिपोसोमल एम्फोटीसिरीन-बी’ लवकरात लवकर सुरू करावे लागते. त्यानंतर ‘पॉसॅकोनाझोल’च्या गोळ्या द्याव्या लागतात. यावरील उपचार प्रणाली लांब चालणारी आणि महागडी आहे. साधारण ३ ते ६ महिने उपचार घ्यावे लागतात. परंतु पूर्वी जिथे वर्षाला ‘एम्फोटीसिरीन-बी’चे १५० ते २०० इंजेक्शन लागायचे आता ५०० इंजेक्शनची रोज मागणी होत आहे. सध्या तरी कुठल्याही केमिस्टकडे हे इंजेक्शन उपलब्ध नाही. ‘पॉसॅकोनाझोल’ गोळ्यांचाही तुटवडा आहे.
-काळा बाजार फोफावला
कोरोना उद्रेकाच्या काळात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा पडून काळ्या बाजारात अव्वाचा सव्वा किंमतीत विकल्या जात होत्या. आता तशीच स्थिती म्युकरमायकोसिसवरील ‘लिपोसोमल एम्फोटीसिरीन-बी’ इंजेक्शनबाबत झाली आहे. ‘५० एमजी’चे हे एक इंजेक्शन ७,५०० रुपयांचे आहे. परंतु काळा बाजारात हे इंजेक्शन १५ ते २० हजारात विकले जात आहे. एका रुग्णाला त्याच्या वजनानुसार साधारण १५० ते ३५० ‘एमजी’ पर्यंत इंजेक्शन द्यावे लागते. ‘पॉसॅकोनाझोल’ १० गोळ्यांची किंमत ५ हजार असताना काळ्या बाजारात याची किंमत १० हजाराच्या घरात गेली आहे.
-शस्त्रक्रियेनंतर औषधोपचार महत्त्वाचा
म्युकरमायकोसिसवरील कुठल्याही शस्त्रक्रियेनंतर तातडीने इंजेक्शन, गोळ्या सुरू कराव्या लागतात. परंतु बजारात औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. मागील चार महिन्यात या आजाराच्या ६६ रुग्णांवर उपचार केले असून यातील ३५ रुग्णांचा एक डोळा काढण्याची वेळ आली. यामुळे लक्षणे दिसताच निदान करणे व उपचार घेणे आवश्यक असल्याचे खासगी रुग्णालयातील एका नेत्ररोग तज्ज्ञाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.
-१७ रुग्णांवर जबड्याचा हाडावर शस्त्रक्रिया
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेंटल) जानेवारी ते आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ४९ रुग्णांची नोंद झाली. यातील १७ रुग्णांवरील जबड्याचा हाडावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
-डॉ. वैभव कारेमोरे, विभाग प्रमुख दंतरोग, डेंटल
-२१ रुग्णांवर ईएनटी शस्त्रक्रिया
मेडिकलमध्ये ३३ रुग्ण उपचाराखाली असून यातील २१ रुग्णांवर ईएनटी विभागाने शस्त्रक्रिया केल्या आहेत. सध्यातरी रुग्णालयात औषधांचा तुटवडा नाही. गरीब रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार केला जात आहे.
-डॉ. अशोक नितनवरे, प्रमुख, ईएनटी विभाग