CoronaVirus in Nagpur : नागपुरात नवीन संक्रमितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 10:24 PM2020-10-13T22:24:01+5:302020-10-13T22:25:13+5:30
Corona Virus, recovery, increase ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नागपूर जिल्ह्यात कोविड संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. नवीन संक्रमितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक नोंदविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नागपूर जिल्ह्यात कोविड संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. नवीन संक्रमितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक नोंदविण्यात आले आहे. मंगळवारी जिल्ह्यात ६६० संक्रमित रुग्ण आढळून आले आणि २० रुग्णांचा मृत्यू झाला मात्र त्यापेक्षा अधिक म्हणजे ९३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट वाढून ८८.१५ टक्केंवर पोहचला आहे.
प्रकृती सुधारणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आणि नवीन संक्रमित कमी होत असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागालाही दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही संक्रमण दिवसेंदिवस घटत असल्याची बाब स्वीकारली आहे, मात्र खबरदारी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. नियमांचे पालन करूनच कोविडला दूर केले जाऊ शकते. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार नवीन संक्रमितांमध्ये शहरातील ४३२ आणि ग्रामीण भागातील २२० व जिल्ह्याबाहेरील ८ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ७, ग्रामीणमधले ५ व जिल्ह्याबाहेरील ८ लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत संक्रमितांची एकूण संख्या ८७,८९० वर आणि मृतांची संख्या २८४० वर पोहचली आहे.
मंगळवारी बरे झालेल्या रुग्णांमध्ये नागपूर शहरातील ६४६ व ग्रामीणमधील २८७ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७७,४७१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये शहरातील ६१,६९१ व ग्रामीणमधील १५,७८० रुग्णांचा समावेश आहे. सध्या ७५७९ रुग्ण सक्रिय असून यामध्ये शहरातील ५००३ व ग्रामीण भागातील २५७६ रुग्णांचा समावेश आहे.
६७४१ नमुन्यांची तपासणी
नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण ६७४१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये शहरातील ५५०७ व ग्रामीणमधील १२३४ आहेत. आतापर्यंत ५ लाख ३० हजार ११२ नमुने तपासले गेले आहेत. मंगळवारी ४४०२ नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये २५४ लोक पॉझिटिव्ह आढळले. खासगी प्रयोगशाळेत २०३ नमुने संक्रमित आढळून आले. एम्सच्या लॅबमध्ये १२, मेडिकलमध्ये ७४, मेयोच्या लॅबमध्ये ४८, माफसूच्या लॅबमध्ये ११ व नीरी ५८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
डबलिंग रेट १०६ दिवसांवर
कोविड संक्रमणाचा वेग कमी झाला आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा दर १०६ दिवसावर पोहचला आहे. ऑगस्ट महिन्यात दुपटीने वाढण्याचा दर १५ दिवसावर होता, जो सप्टेंबर महिन्यात २१ दिवसांवर गेला. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या १३ दिवसात रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे.
अॅक्टिव्ह : ७५७९
बरे झाले : ७७,४७१
मृत : २८४०