CoronaVirus in Nagpur : नागपुरात मुस्लिम धर्मगुरूंनी केले घरी राहण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:43 AM2020-04-02T00:43:59+5:302020-04-02T00:44:39+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी विविध स्तरावर जनजागृती सुरू आहे. मुस्लिम समाजातील धर्मगुरूही आपापल्या पद्धतीने समाजात जनजागृती करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी विविध स्तरावर जनजागृती सुरू आहे. मुस्लिम समाजातील धर्मगुरूही आपापल्या पद्धतीने समाजात जनजागृती करीत आहेत. बुधवारी पोलिसांच्या सहकार्याने कामठी येथे मुस्लिम धर्मगुरूंनी नागरिकांना कोरोनाबाबत माहिती देत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
दिल्ली प्रकरणानंतर नागपुरातील मुस्लिमबहुल परिसरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. नागरिकांना कोरोबा विषाणूबाबत माहिती देत घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात आहेत. या जनजागृतीअंतर्गत आज बुधवारी कामठीमध्ये पोलिसांसह मुस्लिम धर्मगुरूंनीही जनजागृती केली. एका खुल्या जीपवर कामठी परिसरात फिरून धर्मगुरूंनी नागरिकांना कोरोना आजाराबाबत माहिती दिली तसेच कुठल्याही परिस्थिती विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन केले. आपल्या मुलाबाळांनाही घराबाहेर जाऊ देऊ नका, असे आवाहनही केले.
दरम्यान, भालदारपुरा येथे पोलिसांनी विशेष पथकासह पॅट्रोलिंग करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. रस्त्यावर विनाकारण कुणी दिसून आल्यास त्याला घरी पाठवले.