CoronaVirus in Nagpur : बरे होणाऱ्या रुग्णांचा दर नागपूरचा सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:35 PM2020-06-25T23:35:08+5:302020-06-25T23:36:45+5:30
राज्यातील ज्या शहरात एक हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे, त्या शहराच्या तुलनेत नागपुरात रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ७३.३५ टक्क्यांवर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील ज्या शहरात एक हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे, त्या शहराच्या तुलनेत नागपुरात रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ७३.३५ टक्क्यांवर पोहचली आहे. विदर्भात पहिल्यांदाच हजारावर रुग्ण कोरोनामुक्त होणारे नागपूर हे पहिले ठरले आहे. विशेष म्हणजे, बुधवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५१ झाली असताना, गुरुवारी केवळ आठ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १३८५ झाली. शिवाय, आज ५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे होणाºया रुग्णांची संख्या १०१६ वर पोहचली आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील दोन रुग्ण हे मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथील आहेत. दोन आठवड्यापूर्वी याच हॉस्पिटलमधून दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेली एक महिला व तिचे पती पॉझिटिव्ह आले होते. आता पुन्हा दोन रुग्णांचे निदान झाले आहे. याशिवाय, पारडी येथील दोन व मिनी मातानगर येथल एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. खासगी लॅबमधून अमरावती येथील निवासी डॉक्टर पॉझटिव्ह आला आहे. या रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेला एक रुग्ण नरेंद्रनगर येथील आहे. खासगी प्रयोगशाळेतून आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. त्याची माहिती मिळू शकलेली नाही.
जून महिन्यात ७००रुग्ण झाले बरे
मार्च महिन्यात केवळ एक रुग्ण कोरोनामुक्त झाला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात ४३ रुग्णांना सुटी देण्यात आली होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘आयसीएमआर’चे नवे डिस्चार्ज धोरण लागू करण्यात आले. यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना १० दिवसातच सुटी होऊ लागली. या महिन्यात ३०० रुग्णांना सुटी देण्यात आली, तर जून महिन्यात तब्बल ७०० रुग्णांना सुटी मिळाली.
५१ रुग्णांना डिस्चार्ज
मेडिकल, मेयो व एम्स मिळून ५१ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात मेडिकलमधील २३ रुग्ण आहेत. यातील बहुसंख्य रुग्ण हे नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. याशिवाय, तांडापेठ, नरसाळा, हुडकेश्वर रोड, आर्यननगर, धरमपेठ, अमरावती, भगवाननगर, हिंगणा, विश्वकर्मानगर व अमरनगर येथील आहेत. मेयो येथून १३ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात हिंगणा, नाईक तलाव-बांगलादेश, मंगळवारी, चंद्रमणीनगर व भोईपुरा येथील आहेत. एम्समधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात वैशालीनगर हिंगणा, श्रमिकनगर एमआयडीसी, साईनगर हिंगणा, तीन नल चौक येथील रुग्ण आहेत.
नागपुरातील कोरोना स्थिती
संशयित : २,५९१
अहवाल प्राप्त : २३,०५३
बाधित रुग्ण : १३८५
घरी सोडलेले : १०१६
मृत्यू : २१