CoronaVirus in Nagpur : वर्षभरानंतर बाधितांची संख्या शंभराच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:04 PM2021-06-08T23:04:32+5:302021-06-08T23:05:08+5:30
CoronaVirus दुसऱ्या लाटेचे चटके झेललेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात यायला लागली आहे. मंगळवारी जिल्ह्यामध्ये ८१ नवीन बाधित आढळले, तर सहा जणांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या लाटेचे चटके झेललेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात यायला लागली आहे. मंगळवारी जिल्ह्यामध्ये ८१ नवीन बाधित आढळले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. जवळपास एक वर्षानंतर नागपुरात बाधितांची संख्या शंभरहून खाली गेली आहे. मागील वर्षी जून-जुलै महिन्याच्या पातळीवर संसर्गाचा वेग पोहोचला आहे.
२०२० मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कोरोनाची पहिली लाट आली होती. तर दुसरी लाट फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झाली व एप्रिलमध्ये टोकावर पोहोचली. मेमध्ये संसर्गाचा दर वेगाने कमी आला. जूनमध्ये हा आकडा आणखी कमी झाला आहे. जून २०२० मध्ये नागपुरात दोन आकडी पॉझिटिव्ह रुग्ण होते. १७ जुलै २०२० रोजी १०२ नवे बाधित आढळले होते. त्यानंतर १८ जानेवारी २०२१ ला १५०, २५ जानेवारीला १२८, २७ जानेवारी रोजी १६६ बाधित आढळले. त्यानंतर सातत्याने २०० ते ४०० दरम्यानच रुग्णांची नोंद झाली.
मंगळवारी नागपूर जिल्ह्यात ८ हजार २९६ नमुन्यांची तपासणी झाली. तुलनेने ही संख्या कमी होती. यातील ०.९७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले. शहरात ५ हजार ४५५ तर ग्रामीणमध्ये २,८४१ नमुने तपासण्यात आले. शहरातील संसर्गाची टक्केवारी ०.८४ टक्के तर ग्रामीणमधील १.१६ टक्के इतकी होती. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४ लाख ७६ हजार ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर, ८ हजार ९७३ जणांचे मृत्यू झाले.
मंगळवारी आढळलेल्या बाधितांपैकी ४६ शहरातील तर ३३ ग्रामीण भागातील आहेत. शहरातील चार व जिल्ह्याबाहेरील दोन जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात एकही मृत्यू नोंदविल्या गेला नाही. ३८९ रुग्ण ठीक झाले.
सक्रिय रुग्णसंख्या तीन हजाराहून कमी
नागपूर जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरीस ७७ हजार सक्रिय रुग्ण होते. आता ही संख्या घटली असून, २ हजार ९२२ सक्रिय रुग्ण आहेत. यातील २ हजार ३४६ शहरातील तर ५७६ ग्रामीणमधील आहेत. सक्रिय रुग्णांपैकी १ हजार ७८६ होम आयसोलेशनमध्ये असून, १ हजार १३६ विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोनाची मंगळवारची स्थिती :
दैनिक चाचण्या: ८,२९६
शहर : ४६ रुग्ण व ४ मृत्यू
ग्रामीण : ३३ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,७६,००७
एकूण सक्रिय रुग्ण : २,९२२
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,६४,११२
एकूण मृत्यू : ८,९७३