CoronaVirus in Nagpur : तो रुग्ण पुन्हा आला पॉझिटिव्ह : २०० वर नमुने प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 09:31 PM2020-04-03T21:31:31+5:302020-04-03T21:33:22+5:30
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या नमुन्याची आठ दिवसानंतर तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. १४ दिवसानंतर या रुग्णाचे पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत आज शुक्रवारी पहिल्या टप्प्यात १५ संशयितांचे नमुने तपासण्यात आले. यात सर्वच निगेटिव्ह आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या नमुन्याची आठ दिवसानंतर तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. १४ दिवसानंतर या रुग्णाचे पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत आज शुक्रवारी पहिल्या टप्प्यात १५ संशयितांचे नमुने तपासण्यात आले. यात सर्वच निगेटिव्ह आले. विशेष म्हणजे, हे सर्व नमुने मरकजमधून आलेल्यांचे आहेत. नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. या रुग्णापासून आणखी चार बाधितांची नोंद झाली. १४ दिवसानंतर सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून त्यांना घरी पाठविण्यात आले. २६ मार्चला दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या एका रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णामुळे आणखी दहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. या रुग्णाची आज पुन्हा तपासणी केली असता नमुना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या मते रुग्णाला कुठलीही लक्षणे नाहीत. आता १४ दिवसानंतर २४ तासाच्या अंतराने दोन वेळा तपासणी केली जाणार आहे. नमुने निगेटिव्ह आल्यावर रुग्णालयातून सुटी दिली जाईल.
दिल्ली व मरकजमधील शेकडो नमुने
दिल्ली व मरकज येथून आलेल्यांना कॉरन्टाइन करून नमुने घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार मेयो, मेडिकल १ एप्रिलपासून या संशयितांचे नमुने घेत आहे. परंतु मेयोच्या प्रयोगशाळेकडे आधीचे नमुने खूप जास्त असल्याने २०० वर नमुने प्रलंबित आहेत. यातच आज मेयोचे तपासणी यंत्र बंद पडल्याने एका छोट्या यंत्रावरून नमुने तपासण्यात आले. पहिल्या टप्प्यात अमरावतीसह नागपूरचे १६ नमुने तपासण्यात आले असता सर्वच निगेटिव्ह आले.
मरकजमधील नव्या ६५ संशयितांची भर
मरकजमधून आलेल्या नव्या ६५ संशयितांना आज कारन्टाइन करण्यात आले. सध्याच्या स्थितीत आमदार निवासात ३५०, रविभवनात ७६ तर वनामती येथे ८६ असे एकूण ५१० संशयित आहेत.
१२८ नमुन्यांची तपासणी
मेयोच्या प्रयोगशाळेत गुरुवारी रात्री १२८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी पहाटे नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात वाशिम जिल्ह्यातील एक तर नागपुरातील बाधित असलेला रुग्णाचा पॉझिटिव्ह नमुना वगळता उर्वरीत १२६ नमुने निगेटिव्ह आले. आज दिवसभरात मेडिकलमध्ये चार तर मेयोमध्ये २२ संशयितांना दाखल करण्यात आले.
कोरोना आजची स्थिती
दैनिक संशयित ६७
दैनिक तपासणी नमुने १२८
दैनिक निगेटिव्ह नमुने १२६
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने १६
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ०४
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ६९९
कॉरन्टाईन कक्षात एकूण संशयित ५१०