Coronavirus in Nagpur ; नागपुरात कोरोना संक्रमणाचा उच्चांक; ७९९९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 09:03 PM2021-04-24T21:03:59+5:302021-04-24T21:06:30+5:30
Coronavirus in Nagpur नागपूर जिल्ह्यात शनिवारी ७९९९ पॉझिटिव्ह आढळून आले तर ८२ जणांचा मृत्यू झाला. मागील चार दिवसांत सर्वाधिक बाधितांचा उच्चांक गाठला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध प्रकारचे निर्बंध घातल्यानंतरही नागपूर जिल्ह्यातील संक्रमणाचा आकडा कमी होताना दिसत नाही. शनिवारी मागील चार दिवसांत सर्वाधिक बाधितांचा उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात एका दिवसात ७९९९ पॉझिटिव्ह आढळून आले तर ८२ जणांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांत संक्रमणाचा प्रकोप सुरू आहे. एप्रिल महिन्यात सहा दिवसांत ७ हजारांहून अधिक बाधित मिळत आहेत. शनिवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ३१.६१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर महिन्यात आली होती. त्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अर्थात एप्रिल महिन्यात तीन पटीहून अधिक रुग्ण आढळले आहेत. एप्रिल महिन्यात आतापर्यंत १,४०,३७९ संक्रमित आढळून आले तर १७५१ जणांचा मृत्यू झाला. तर सप्टेंबर महिन्यात १४०६ बाधितांचा मृत्यू झाला होता. यावरून परिस्थिती गंभीर असल्याचा अंदाज येतो.
शनिवारी मिळालेल्या संक्रमितांत शहरातील ५२३६, ग्रामीणचे २७५५ व जिल्ह्याबाहेरील ८ आहेत. मृतांत शहरातील ३९, ग्रामीण ३५ तर जिल्ह्याबाहेरील ८ आहेत. शनिवारी ६२६४ कोरोनामुक्त झाले. यात शहरातील ३८५६, ग्रामीणचे २४०८ आहेत. आतापर्यंत २,८४,५६६ संक्रमित कोरोनामुक्त झाले. रिकव्हरी रेट ७७.६६ टक्के आहे.
२४ दिवसांत ५ लाखांहून अधिक नमुन्यांची तपासणी
नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात २४ दिवसांत विक्रमी ५ लाख ९ हजार ४१९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत २१ लाख ३३ हजार ६९६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. गेल्या २४ तासांत २५,३०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील १६,९५९ तर ग्रामीण मधील ८,३४१ आहेत.
सक्रिय ७५ हजारांहून अधिक
नागपूर जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या ७५,००२ पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील ४५,७८५ तर ग्रामीण मधील २९,२१७ आहेत. यातील ५७,९४७ गृहविलगीकरणात असून १७,०५५ विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये ८९२, मेयो ६२५, एम्समध्ये १७४, इंदिरा गांधी रुग्णालयात ९०, आयसोलेशन रुग्णालय ३२, आयुष रुग्णालय ४२, पाचपावली डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये ६३ रुग्ण भरती आहेत. खासगी रुग्णालयातही बेड शिल्लक नाही.
जिल्ह्यात वाढणारे संक्रमण व मृत
१९ एप्रिल ६३६४ ११३
२० एप्रिल ६८९० ९१
२१ एप्रिल ७२२९ ९८
२२ एप्रिल ७३४४ ११०
२३ एप्रिल ७४८५ ८२
२४ एप्रिल ७९९९ ८२
ॲक्टिव्ह ७५००२
कोरोनामुक्त २८४५६६
मृत - ६८४९