CoronaVirus in Nagpur : नागपूर ग्रामीणमध्ये वाढतोय कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 12:42 AM2021-05-19T00:42:42+5:302021-05-19T00:44:08+5:30
Corona Virus कोरोनाचा ग्राफ एकूणच नागपूर जिल्ह्यात खाली उतरताना दिसून येत असला तरी, शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा ग्राफ एकूणच नागपूर जिल्ह्यात खाली उतरताना दिसून येत असला तरी, शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्याचे धक्कादायक चित्र आहे. मंगळवारी ग्रामीणमध्ये कोरोनाचे अधिक बळी गेले. चाचण्यांची संख्या कमी असताना शहराच्या बरोबरीने रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात आज ११,२४९ चाचण्यांमधून ५९१ रुग्णांची व १४ मृत्यूची नोंद झाली, तर ग्रामीणमध्ये ५९४८ चाचण्यांमधून ५८६ रुग्णांची नोंद होताना, १५ रुग्णांचे बळी गेले आहेत. शहराचा पॉझिटिव्हिटी दर ५.२९ टक्के असून ग्रामीणचा ९.८५ टक्के आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहराच्या तुलनेत ग्रामीणची रुग्णसंख्या व मृत्यूची संख्या जवळपास ४५ टक्क्याने कमी होती. परंतु दुसरी लाट ओसरत असताना ग्रामीणमधील कोरोनाबाबतची स्थिती चिंता व्यक्त करणारी ठरत आहे. आज नागपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक १७,१९७ चाचण्या झाल्या. यामुळे सोमवारी हजाराखाली आलेली रुग्णांची संख्या पुन्हा हजारावर गेली. शिवाय, मृत्यूसंख्येतही वाढ झाली. समाधानकारक बाब म्हणजे, दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत ४०७३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४,३२,८१७ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
१९ दिवसात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांत नागपूरचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे, १९ दिवसांपूर्वी २९ एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ७७,६२७ होती. त्यानंतर ही संख्या मात्र कमी-कमी होत गेली. मंगळवारी ही संख्या २३,९६५ वर स्थिरावली. सध्या शासकीयसह खासगी रुग्णालयांत व कोविड केअर सेंटरमध्ये ५,८८९ रुग्ण उपचाराखाली आहेत, तर १८,०७६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १७,१९७
शहरात : ५९१ रुग्ण व १४ मृत्यू
ग्रामीणमध्ये : ५८६ रुग्ण व १५ मृत्यू
ए. बाधित रुग्ण : ४,६५,४०३
ए. सक्रिय रुग्ण : २३,९६५
ए. बरे झालेले रुग्ण : ४,३२,८१७
ए. मृत्यू : ८,६२१