Coronavirus in Nagpur; कोरोनामुळे मनोरुग्णांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 07:00 AM2021-04-28T07:00:00+5:302021-04-28T07:00:02+5:30
कोरोना संसर्गामुळे नागपुरातील शासकीय मनोरुग्णालयात उपचार करणाऱ्या मनोरुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज बाधितांचा आकडा वाढत असून काही रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे.
आशीष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गामुळे नागपुरातील शासकीय मनोरुग्णालयात उपचार करणाऱ्या मनोरुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज बाधितांचा आकडा वाढत असून काही रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. मात्र तरीदेखील आरोग्य विभागाने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत मनोरुग्णालयातील साडेचारशेपैकी १२५ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील सात जणांचा मृत्यूदेखील झाला. कोरोना संसर्गाचा वेग जास्त असूनदेखील रुग्णालय प्रशासन व आरोग्य विभागाने काहीच पावले उचलेली नाहीत. मनोरुग्णालयात कोरोनाचा संसर्गाचे पहिले प्रकरण ७ मार्च रोजी समोर आले होते. कोरोनावर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, हेच प्रशासकीय उत्तर रुग्णालयाकडून देण्यात येत आहे. प्रत्यक्षात असे काहीच झालेले नाहीत. काही कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची बाधा झाली आहे.
रुग्णांचे लसीकरण नाही
मनोरुग्णालयातील रुग्णांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काहीच प्रयत्न केले नाही. लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठविण्यात आले आहे असाच दावा सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार व विभागातील इतर अधिकारी यांच्याकडून मागील एक महिन्यापासून करण्यात येत आहे. केंद्राकडून काय उत्तर मिळाले हे सांगण्याची तसदी डॉ. जोगेवार यांनी घेतली नाही. मनोरुग्णांकडे आधार कार्ड नाही, त्यामुळे त्यांच्या लसीकरणात अडचणी येत आहेत. आमचे एकूण स्थितीवर लक्ष आहे. इतर रुग्णांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनादेखील लस लावण्यात आलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.