CoronaVirus in Nagpur : नागपूर शहरातील ३० लाख लोकांचा सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 08:07 PM2020-03-26T20:07:02+5:302020-03-26T20:12:11+5:30
कोरोना संशयित वा बाधित लोकांच्या संपर्कात कुणी आले का, याची शहानिशा करण्यासाठी संपूर्ण नागपूर शहरातील २७ ते ३० लाख लोकांच्या सर्व्हेक्षणाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या ३८ प्रभागात हा सर्व्हे केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित चार रुग्ण आढळून आल्याने महापालिकेतर्फे लक्ष्मीनगर व धरमपेठ भागात रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर परिसरातील ६४ हजार ४३६ कु टुंबांचा सर्व्हे करून २ लाख ६४ हजार ६१७ लोकांची माहिती घेण्यात आली. आता उर्वरित आठ झोनमधील ४ लाख ९१ हजार ५६४ कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण शहरातील २७ ते ३० लाख लोकांच्या सर्व्हेक्षणाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या ३८ प्रभागात हा सर्व्हे केला जात आहे. झोन स्तरावर याचे नियोजन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळून यात झोनमधील जवळपास ९० टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. माहिती संकलित करताना कु टुंबातील कुणी विदेशात आहे का, शहराबाहेर जाऊन कुणी आले का, कोरोना संशयित वा बाधित लोकांच्या संपर्कात कुणी आले का, याची शहानिशा केली जात आहे. सर्वेक्षणाला नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. परंतु संचारबंदी असूनही काही नागरिक घराबाहेर दिसतात. त्यांनी घराबाहेर पडू नये. संचारबंदी नागरिकांच्या आरोग्याचे हित विचारात घेऊनच लावण्यात आलेली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी दिली.
सर्व्हे नागरिकांच्या हिताचाच
लक्ष्मीनगर व धरमपेठ भागातील सर्व्हेत सुदैवाने कुणीही कोरोनाबाधित आढळून आले नाही. परंतु कोरोनाबाबत लोकांनी काय करावे, काय करू नये, नाका-तोंडाला हात लावू नये, घरात बसतानाही किती अंतर ठेवावे, कुु टुंबातील सदस्यांचे वय, त्यांना कुठला आजार आहे का, उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार अशा गंभीर आजाराविषयी माहिती संकलित केली जात आहे. यातून अशा लोकांची विशेष काळजी घेण्याविषयी नियोजन करता येईल, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा
संचारबंदी दरम्यान शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. औषधे, किराणा, भाजीपाला अशा आवश्यक वस्तूंची कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही गररजेपेक्षा जादा साठा करू नये. जीवनावश्यक वस्तूंची होत डिलिव्हरी करता येईल का, याचाही आढावा घेतला जात आहे. दुकानाच्या परिसरातील नागरिकांना मागणीनुसार घरपोच सामानाचा पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची मााहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.