CoronaVirus in Nagpur : दिल्लीतील मरकजहून परतलेला संशयित नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 08:24 PM2020-03-31T20:24:57+5:302020-03-31T20:27:54+5:30
दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजवरून नागपुरात परतलेल्या सुमारे आठ व्यक्तींपैकी एका संशयिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजवरून नागपुरात परतलेल्या सुमारे आठ व्यक्तींपैकी एका संशयिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मेडिकलमध्ये या संशयित व्यक्तीचे कोरोना (कोविड-१९) असे निदान झाले आहे. वैद्यकीय अहवालाची आता प्रतीक्षा आहे. सोमवारी दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरातील २०० व्यक्तींमध्ये कोरोना संक्रमणाची लक्षणे आढळल्याने देशभर खळबळ उडाली होती. हे सर्वजण निजामुद्दीन येथील मरकजमध्ये एकत्रित होते, हे उल्लेखनीय.
दिल्लीमधील हे प्रकरण पुढे आल्यावर ‘लोकमत’ने अधिक माहिती घेतली असता, १० मार्चला सुमारे ८ व्यक्ती दिल्ली मरकज येथून नागपुरात परतल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, या परतणाऱ्यांमधील एकाला युरिनल इन्फेक्शन झाल्याने धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र अनेक दिवस उपचार करूनही आराम न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याला ३० मार्चला मेडिकलमध्ये रेफर केले. तिथे या संश्यिताची कोरोना चाचणी करण्यात आली.
दिल्लीमधील या घटनेनंतर ‘लोकमत’ने नागपुरातील मरकजशी संबंधित जबाबदार व्यक्तींसोबत संपर्क साधला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संशयित व्यक्तीसोबत नागपुरात परतलेले सर्वजण स्थानिक रहिवासी आहेत.ते सर्व जण ६ मार्चला एका मजलिससाठी दिल्लीमधील मरकजला गेले होते.
कोणत्याही सामान्य आजाराची लक्षणे दिसल्यावर कोरोनाची तपासणी होणे अनिवार्य आहे. सोमवारी दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. अहवाल यायचा आहे.
डॉ. मो. फैसल, जीएमसी, नागपूर
नागपूर मरकजने यापूर्वीच केले क्वारंटाईन
दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरातील घटना उजेडात येताच नागपुरातही खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर नागपूर मरकजने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येथे आलेल्या सर्वांची माहिती लॉकडाऊन होताच प्रशासनाकडे सादर करण्यात आली. त्यानंतर सर्र्वांना क्वारंटाईन करण्यात आले. हे सर्व जण लोग मशिदीत, मरकजमध्ये आणि काही आपल्या घरात सुरक्षित आहेत.
नागपूर मरकजचे हाजी अब्दुल बारी पटेल यांच्या मते, परतणाऱ्यांमध्ये एकूण ५४ जणांचा समावेश आहे. यातील आठ जण विदेशी (बर्मा) येथील असून, ४६ जण भारतामधील वेगवेळ्या भागातून आलेले आहेत. लॉकडाऊन होताच सर्वांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे निर्देश देऊन वेगवेगळ्या मशिदींमध्ये तसेच घरांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. यातील पाच जणांना नागपूर मरकजमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रशासनालाही यासंदर्भात आधीच कळविण्यात आले आहे. पोलीस प्रशासनासोबत चर्चा करून त्यांना परत पाठविण्याची परवानगी मागितली जात आहे. ती मिळाल्यास या सर्वांना त्यांच्या गावात आणि देशात पाठविले जाईल. दिल्लीमधील मरकजसारखेच नागपुरातील मरकजमध्येही देशभरातील नागरिक येत असतात, हे विशेष!