CoronaVirus in Nagpur : सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे हजारावर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 10:45 PM2021-03-06T22:45:48+5:302021-03-06T22:47:47+5:30
CoronaVirus कोरोना प्रादुर्भावाचा आलेख वाढतच चालला आहे. सलग चौथ्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या हजारावर गेली. शनिवारी ११८३ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रादुर्भावाचा आलेख वाढतच चालला आहे. सलग चौथ्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या हजारावर गेली. शनिवारी ११८३ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६४५८ तर, मृतांची संख्या ४३८३ झाली. सक्रिय रुग्णसंख्येनेही आज १० हजारांचा टप्पा ओलांडला. कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १०७४६ झाली आहे. यातील २८२४ रुग्ण विविध रुग्णालयात तर ७९२२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. धक्कादायक म्हणजे, घरी सोयी नसताना अनेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. परिणामी, रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. बंद असलेले आमदार निवासातील कोविड केअर सेंटर सुरू कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागपूर जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपासून दैनंदिन चाचण्यांची संख्या १० हजारांवर जात आहे. आज १०७८८ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात सर्वाधिक , ७०९८१ आरटीपीसीआर तर २८०७ रॅपीड अँटिजेन चाचण्या होत्या. चाचण्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या १०.९६ टक्के आहे. आज शहरातील ७९३, ग्रामीण भागातील ६७ असे एकूण ८६० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १४१३२९ झाली आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांचा दर घसरून ९०.३३ टक्क्यांवर आला आहे. शहरात ११४०७७ तर ग्रामीणमध्ये २७२५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तज्ज्ञाच्या मते, रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी गंभीर रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे.
शहरात कोरोनाचे सव्वा लाख रुग्ण
कोरोनाचा या बारा महिन्याच्या काळात शहरात कोरोनाचे सव्वा लाख रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये हा आकडा ३० हजारापुढे गेला आहे. तर जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्या हजाराजवळ पोहचली आहे. आज शहरात ९०४, ग्रामीण भागात २७६ तर जिल्हाबाहेरील ३ नव्या रुग्णांची भर पडली. शिवाय, शहरात आतापर्यंत २८२७, ग्रामीणमध्ये ७८० तर जिल्हाबाहेरील ७७६ रुग्णांचे मृत्यू झाले. आज शहरात ५, ग्रामीणमध्ये १ तर जिल्हाबाहेरील ३ मृत्यू आहेत.
कोरोनाची स्थिती
दैनंदिन चाचण्या : १०७४६
एकूण रुग्ण : १५६४५८
बरे झालेले रुग्ण : १४१३२९
सक्रिय रुग्ण : १०७४६
एकूण मृत्यू : ४३८३