CoronaVirus in Nagpur : नागपुरात नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 11:10 PM2020-10-09T23:10:13+5:302020-10-09T23:11:55+5:30

Corona Virus, Nagpur Newsकोरोनाचे थैमान हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. मृतांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. शुक्रवारी शहरात १३, ग्रामीणमध्ये सात तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्णांचे असे एकूण २६ मृत्यूची नोंद झाली.

CoronaVirus in Nagpur: Twice as many patients recover in Nagpur | CoronaVirus in Nagpur : नागपुरात नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे

CoronaVirus in Nagpur : नागपुरात नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे

Next
ठळक मुद्दे१,२७१ रुग्ण कोरोनामुक्त : ६३६ पॉझिटिव्ह तर २६ रुग्णांच्या मृत्यूची भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे थैमान हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. मृतांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. शुक्रवारी शहरात १३, ग्रामीणमध्ये सात तर जिल्ह्याबाहेरील सहा रुग्णांचे असे एकूण २६ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, आज चाचण्यांची संख्या ६,८०९ वर गेली असताना मागील सात दिवसांच्या तुलनेत सर्वात कमी, ६३६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर त्याच्या दुप्पट, १२७१ कोरोनाबाधित बरे झाले. रुग्णांची एकूणसंख्या ८५,४६३ झाली असून मृतांची संख्या २,७५० वर पोहचली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सण, उत्सवाच्या तोंडावर कमी होऊ लागला आहे. यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु खबरदारी अपेक्षित असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. नागपूर जिल्ह्यात आज चाचण्यांची संख्या वाढली. ३५१२ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. यात ४०३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ३२९७ रुग्णांच्या झालेल्या रॅपिड अँटिजेन चाचणीत २३३ रुग्ण निगेटिव्ह आले. मागील दीड महिन्याच्या कालावधीत ही संख्या पहिल्यांदाच समोर आली आहे. एम्सच्या प्रयोगशाळेतील ३४० चाचण्यांमधून ३७, मेडिकलच्या प्रयोगशाळेतील ५६५ चाचण्यांमधून १२, मेयोच्या प्रयोगशाळेतील ३९४ चाचण्यामधून ४०, माफसूच्या प्रयोगशाळेतील १३८ चाचण्यामधून २३, नीरीच्या प्रयोगशाळेतील २५७ चाचण्यामधून ६१ तर खासगी लॅबमधील १८०६ चाचण्यामधून २३० रुग्ण पॉझिटिव्ह आले.

रुग्ण बरे होण्याचा दर ८६ टक्क्यांवर
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचा दर ४१ टक्क्यांवर असताना आता तो ८६.४५ टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत शहरातील ५९,११६ व ग्रामीणमधील १४,७६९ असे एकूण ७३,८८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या शहरातील ५,८९७ व ग्रामीणमधील २,९३१ असे एकूण ८,८२८ रुग्ण उपचाराखाली आहेत. रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा दरही ७९.१ दिवसांवर गेला आहे.

मेयोत बाधितांची संख्या २००च्याखाली
ऑगस्ट महिन्यापासून वेग धरलेल्या बाधितांच्या संख्येमुळे सप्टेंबर महिन्यात मेयो, मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलच्या ६०० खाटा कमी पडू लागल्या होत्या. परंतु मेयोमध्ये आता २००च्या खाली, १६८ रुग्ण उपचार घेत आहेत. मेडिकलमध्ये २६६ तर एम्समध्ये ३२ रुग्ण भरती आहेत. काही खासगी हॉस्पिटलमध्येही रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

९३ वर्षाच्या वृद्धाने केली कोरोनावर मात
महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगरमधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पद्माकर चवडे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव नागपुरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहज मात करता येते, असे पद्माकर चवडे यांनी दाखवून दिले आहे. पद्माकर चवडे यांना कोविड - १९ ची लक्षणे दिसल्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मेयो रुग्णालयामध्ये ७ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर येथे भरती करण्यात आले. आई.जी.आर मध्ये त्यांना डॉ. अजय हरदास यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. डॉ. हरदास यांनी सांगितले की, त्यांना आॅक्सिजन सपोर्ट देण्यात आला होता. नंतर त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली आणि त्यांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी १०० हून अधिक बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना भरती केला जात आहे. सध्या ४१ रुग्णांना उपचार घेत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी आई.जी.आर चे डॉक्टर व स्टाफचे अभिनंदन केले आहे.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,८०९
बाधित रुग्ण : ८५,४६३
बरे झालेले : ७३,८८५
उपचार घेत असलेले रुग्ण : ८,८२८
मृत्यू : २,७५०

Web Title: CoronaVirus in Nagpur: Twice as many patients recover in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.