CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी दोन पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ५८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:46 PM2020-04-16T20:46:31+5:302020-04-16T20:47:31+5:30
एक दिवसाच्या उसंतीनंतर गुरुवारी आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले. गिट्टीखदान येथील रहिवासी २५ वर्षीय युवकाची अजमेर प्रवासाची तर तारसा, कन्हान येथील रहिवासी ६१ वर्षीय व्यक्तीच दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक दिवसाच्या उसंतीनंतर गुरुवारी आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले. गिट्टीखदान येथील रहिवासी २५ वर्षीय युवकाची अजमेर प्रवासाची तर तारसा, कन्हान येथील रहिवासी ६१ वर्षीय व्यक्तीच दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे. हे दोन्ही रुग्ण गेल्या १४ दिवसापासून रविभवन येथे क्वारंटाइन होते. या रुग्णासह नागपुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८ झाली आहे. दिवसभरात तपासण्यात आलेल्या नमुन्यात १४६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ११ ते १४ एप्रिलदरम्यान सर्वाधिक ३१ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. १५ एप्रिल रोजी मात्र एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहिसा कमी झाला. परंतु गुरुवारी पुन्हा दोन नमुन्याचा अहवाल कोरोनाबाधित आला. यातील एक गिट्टीखदान तर दुसरा रुग्ण तारसा, कन्हान येथील आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही रुग्णांना २ एप्रिल रोजी क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यापूर्वी ते काही दिवस आपल्या घरी असावेत. यामुळे यंत्रणेला दोघांच्या रहिवासी परिसरात परिश्रम घ्यावे लागणार आहे.
एम्स, मेडिकल व मेयोने तपासले १५० नमुने
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७० नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील ४१ तर अमरावती जिल्ह्यातील २९ नमुन्यांचा समावेश होता. दोन्ही जिल्ह्यातील एक-एक नमुना पुन्हा तपसणीसाठी पाठविण्यात आला. उर्वरीत ६८ नमुने निगेटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) याच वेळेपर्यंत केवळ ३२ नमुने तपासले. यात आमदार निवास व मेडिकलमधील संशयित रुग्णांचे नमुने होते. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) ४८ नमुने तपासले. हे सर्व नमुने रविभवन येथील संशयितांचे होते. यातील दोन पॉझिटिव्ह तर उर्वरीत ४६ नमुने निगेटिव्ह आले. एकूण १५० नमुने तपासण्यात आले असून १४६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
त्या दोन्ही रुग्णाचे पहिले नमुने निगेटिव्ह
पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही रुग्णाला २ एप्रिल रोजी रविभवन येथील अलगीकरण कक्षात दाखल केले. त्यापूर्वी त्यांना मेयोत भरती करून नमुने तपासण्यात आले. यात दोघेही निगेटिव्ह आले होते. परंतु प्रवासाचा इतिहास असल्याने रविभवनात १४ दिवसासाठी क्वारंटाइन करण्यात आले. आज नमुने पॉझिटिव्ह आल्याने आता पुन्हा १४ दिवस रुग्णालयात रहावे लागणार आहे. डॉक्टरांच्या मते त्यांना कुठलीही लक्षणे नाहीत. रविभवनातून ३५ संशयितांना घरी पाठविले
संस्थात्मक अलगीकरण कक्षात २ एप्रिलपासून रविभवनाचा समावेश झाला. यात ७६ संशयितांना ठेवण्यात आले होते. यातील ४८ संशयितांचे नमुने तपासण्यात आले. दोन पॉझिटिव्हसह ४६ नमुने निगेटिव्ह आले. यात दुसऱ्यांदा तपासणी करून निगेटिव्ह आलेल्या ३५ संशयितांना घरी पाठविण्यात आले. पुढील १४ दिवस त्यांना होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ५०
दैनिक तपासणी नमुने १५०
दैनिक निगेटिव्ह नमुने १४६
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५८
नागपुरातील मृत्यू ०१
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १०४८
कॉरन्टाईन कक्षात एकूण संशयित ५६०