CoronaVirus in Nagpur : बेवजह घर से निकलने की जरुरत क्या है...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:46 PM2020-03-31T21:46:12+5:302020-03-31T21:48:09+5:30
लॉकडाऊनमध्ये काही टवाळखोर व बेजबाबदार लोक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:चा व त्यांच्या कुटुंबाचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा बेदरकार लोकांना झोन ३ चे डीसीपी राहुल माकणीकर यांनी भावनिक साद घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून समजाविले जात आहे आणि बळाचाही वापर केला जात आहे. मात्र काही टवाळखोर व बेजबाबदार लोक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:चा व त्यांच्या कुटुंबाचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशा बेदरकार लोकांना झोन ३ चे डीसीपी राहुल माकणीकर यांनी भावनिक साद घातली आहे. बाहेरची हवा जीवघेणी झाली आहे, कोरोना विषाणूचा संसर्ग असलेला कुठला कातिल तुमचा जीव घेईल हे सांगता येत नाही, असे सांगताना एका शायरने रचलेल्या, ‘बेवजह घर से निकलने की जरुरत क्या है, युं ही कातिल से नजरे मिलाने की जरुरत क्या है...’ या ओळीतून ते लोकांना घरातच सुरक्षित राहण्याचे भावनिक आवाहन करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आणि नागपुरातही विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. अशावेळी प्रशासन आणि पोलीस वारंवार घरात राहण्याचा, स्वत:च्या व इतरांच्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत. कधी समजावून तर कधी सक्तीने लोकांना घरात राहण्यास सांगितले जात आहे. मात्र काहींची बेजबाबदार वृत्ती गेलेली दिसत नाही. संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीची शिथिलता ठेवण्यात आली आहे. मात्र याचा फायदा घेऊन काही लोक काही काम नसताना बाहेर पडून लॉकडाऊनचे उल्लंघन करीत आहेत. अशांना पोलिसांकडून भावनिक साद घातली जात आहे. डीसीपी राहुल माकणीकर यांनी सोशल अकाउंटवरून सध्या सर्वत्र व्हायरल होत असलेल्या कवितेतून घरी राहण्याचे भावनिक आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग कुणाला असेल ते सांगता येत नाही. अशावेळी घराबाहेर पडल्यानंतर आपण कुणाला भेटू आणि कुणाकडून त्याची लागण आपल्याला होईल, याची शाश्वती नाही. बाहेर असलेला कोरोना संसर्गित व्यक्ती तुम्हालाही त्या विषाणूची लागण करील आणि तुमचा व तुमच्या कुटुंबाचा जीव धोक्यात येईल. त्यामुळे ते ‘बेवजह कातिल से उलझने की जरुरत क्या है...’ असे समजावित आहेत. तुमचे मन घराबाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करीत असेल तरी तुमच्या पायांना थांबवा. हा काळ कठीण आहे आणि आपण घरात थांबल्यास तो लवकर जाईल, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. नागपूरकरांनो खबरदारी घ्या, पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहन आम्हीही तुम्हाला करीत आहोत.