CoronaVirus in Nagpur : पॉझिटिव्ह बंदिवान गायब होतो तेव्हा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:47 PM2020-07-06T23:47:20+5:302020-07-06T23:48:55+5:30
मध्यवर्ती कारागृहातील पॉझिटिव्ह आलेल्या चार बंदिवानांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी एक बंदिवान अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली. शोधाशोध सुरू झाल्यावर बंदिवान सापडल्याने सर्वांनीच सुटेकचा नि:श्वास टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील पॉझिटिव्ह आलेल्या चार बंदिवानांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी एक बंदिवान अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली. शोधाशोध सुरू झाल्यावर बंदिवान सापडल्याने सर्वांनीच सुटेकचा नि:श्वास टाकला. परंतु अशा घटना होऊ नयेत म्हणून या चारही बंदिवानांना मेयोत दाखल करण्यात आले. मेयोत आता आठ बंदिवान उपचार घेत आहेत. नागपुरात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली असून सोमवारी ३१ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या १,७९४ वर पोहचली आहे.
मध्यवर्ती कारागृहातील ४२ बंदिवान पॉझिटिव्ह आल्याने यातील २१-२१ बंदिवानांना मेयो व मेडिकलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. रविवारी तपासणी झाल्यानंतर दोन्ही रुग्णालयांनी लक्षणे असलेल्या चार-चार बंदिवानांना उपचारासाठी दाखल करून उर्वरितांना पुन्हा कारागृहात पाठविले. मेडिकलमध्ये सोमवारी दुपारी उपचार घेत असलेल्या चारमधून एक बंदिवान आपल्या खाटेवर नसल्याचे एका डॉक्टरला कळताच शोधाशोध सुरू झाली. सुरक्षारक्षकांपासून सर्वच त्याचा शोध घेऊ लागले. सीसीटीव्हीमध्ये तो खालच्या वॉर्डात असल्याचे दिसून येताच सुरक्षारक्षकाने त्याला पकडून वॉर्डात आणले. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आठही बंदिवानांना एकत्र ठेवण्याच्या सूचना करताच मेडिकलच्या बंदिवानांना मेयोत दाखल करण्यात आले.
सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या ३१ रुग्णांमध्ये खासगी प्रयोगशाळेतून कमाल चौक व कोराडी येथील प्रत्येकी एक रुग्ण, माफसुच्या प्रयोगशाळेतून सिम्बायोसिस येथे क्वारंटाईन असलेले तीन रुग्ण, नीरीच्या प्रयोगशाळेतून पाचपावली क्वारंटाईन सेंटर येथील १८ रुग्ण, एम्सच्या प्रयोगशाळेतून दोन, मेयोच्या प्रयोगशाळेतून सीवनी येथील एक, भांडेवाडी येथील एक, बजेरिया येथील दोन व हंसापुरी येथील एक रुग्ण तर मेडिकलच्या प्रयोगशाळेतून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला.
१७ रुग्णांना डिस्चार्ज
मेयो व मेडिकलमधून बरे झालेल्या १७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १,३७७ झाली आहे. मेयोतून बरे झालेले आठ रुग्ण हे यशोधरानगरातील चार, त्रिमूर्तीनगर, रामेश्वरी, टिमकी व सत्यमनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मेडिकलमधून नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यात कामठी, गडचिरोली, रिधोरा, चंद्रमणीनगर व सतरंजीपुरा येथील प्रत्येकी एक, नाईक तलाव येथील चार रुग्ण आहेत.
संशयित : १,८६६
अहवाल प्राप्त : २७,४१७
बाधित रुग्ण : १,७९४
घरी सोडलेले : १,३७७
मृत्यू : २६