CoronaVirus: दिलासा! देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरला मिळणार ऑक्सिजनचे 5 टँकर्स; अशी केली प्लॅनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 06:47 PM2021-04-21T18:47:08+5:302021-04-21T18:48:31+5:30
आता पुढील 10 दिवसांत, दिवस आड एक टँकर, असे 5 ऑक्सिजन टँकर नागपूरला मिळणार आहेत...
नागपूर- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरला ऑक्सिजनचे पाच टँकर्स उपलब्ध होणार आहेत. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेतली आणि हा संपूर्ण समन्वय घडवून आणला. (Nagpur will get 5 tankers of oxygen through the initiative of Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस हे मंगळवारपासूनच सिलतरा, रायपूर येथील जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टिल प्लांटचे सह-व्यवस्थापकीय संचालक रमेश जयस्वाल यांच्या संपर्कात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देत त्यांनी ऑक्सिजनचे पाच टँकर्स देण्याची तयारी दर्शविली. यानंतर प्रश्न होता, तो ऑक्सिजन नागपूरला आणण्याचा. यासाठी फडणवीस यांनी जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही टँकर्स देण्याचे मान्य केले. यानंतर फडणवीस यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि या दोघांचे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे करून देत लवकरात लवकर पुढील कारवाई करावी, अशी विनंती केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता पुढील 10 दिवसांत, दिवस आड एक टँकर, असे 5 ऑक्सिजन टँकर नागपूरला मिळणार आहेत.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जयस्वाल्स निको लि. कंपनीचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सह-व्यवस्थापकीय संचालक रमेश जयस्वाल, तसेच जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांचे आभार मानले आहेत. यावेळी चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवालही उपस्थित होते.