CoronaVirus in Nagpur : होय...मी केली 'कोरोना'वर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:33 PM2020-03-31T22:33:49+5:302020-03-31T22:34:53+5:30
अमेरिकेत एका परिषदेनिमित्त गेलो अन् परत आल्यावर नखशिखांत हादरविणारा धक्काच बसला. सर्वांना दहशतीत टाकणाऱ्या ‘कोरोना’ने मलादेखील वेढले होते. मनात शंका, भीती, काहूर अन् विचारांचे थैमान माजले होते. मात्र आरोग्य यंत्रणेमुळे मनावरचा ताण हलका झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्यात सगळे काही ‘ऑल इज वेल’च चालले होते. अमेरिकेत एका परिषदेनिमित्त गेलो अन् परत आल्यावर नखशिखांत हादरविणारा धक्काच बसला. सर्वांना दहशतीत टाकणाऱ्या ‘कोरोना’ने मलादेखील वेढले होते. मनात शंका, भीती, काहूर अन् विचारांचे थैमान माजले होते. मात्र आरोग्य यंत्रणेमुळे मनावरचा ताण हलका झाला. त्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले आणि आज मी माझ्या पायांनी स्वत:च्या घरी पोहोचलो आहे. आज मी म्हणू शकतो की, ‘हो मी कोरोनावर मात केली आहे. ‘कोरोना’तून बाहेर पडलेल्या नागपुरातील ‘आयटी’ अभियंत्याने ही भावना व्यक्त केली व आपल्या लढ्याबद्दल सांगितले.
अमेरिकेतून परत आल्यानंतर तीन सहकाऱ्यांना ‘कोरोना’ झाल्याचे समजले. त्यानंतर मी घरीच स्वत:ला ‘क्वारंटाईन’ केले व तपासणीसाठी गेलो. मला ‘असिम्टोटिक कोरोना’ झाल्याचे निदान झाले. मला ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये ठेवण्यात आले व उपचारांना सुरुवात झाली.
रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी डॉक्टरांकडून मला ‘मल्टिव्हिटॅमिन’ गोळ्या देण्यात आल्या. या कालावधीत प्रचंड तणाव आला होता. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न व रुग्णालयातील सुविधा पाहून थोडा दिलासा मिळत होता.
डॉक्टरांच्या सूचनेनुसार मी स्वत:चे वेळापत्रक बनविले. त्यात वाचन, खोलीतच चालणे, सकारात्मक वाचन व ‘व्हिडीओ’ यांचा त्यात समावेश होता. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले अन् सातव्या दिवशी माझी नमुना तपासणी ‘निगेटिव्ह’ आली, असे संबंधित अभियंत्याने सांगितले.
योग्य काळजी आवश्यक
‘कोरोना’ला योग्य काळजी घेऊन पूर्ण हरवता येते. मी एकांतवासाचा पूर्ण सुयोग्य वापर केला होता. रूममध्येच व्यायाम केला. तसेच सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी चौरस आहारही घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात ठेवली होती. जर नागरिकांना ‘कोरोना’पासून वाचायचे असेल तर त्यांनी घरीच सुरक्षित थांबावे, असे त्यांनी आवाहन केले.