CoronaVirus in Nagpur : दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 10:16 PM2021-06-05T22:16:31+5:302021-06-05T22:16:57+5:30
CoronaVirus, Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात चिंता वाढवली असताना महिनाभरात दिलासादायक चित्र निर्माण झाले. शनिवारी पहिल्यांदाच ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात चिंता वाढवली असताना महिनाभरात दिलासादायक चित्र निर्माण झाले. शनिवारी पहिल्यांदाच ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली. ७१ रुग्ण आढळून आले. शहरात १२३ रुग्ण व ३ मृत्यू नोंदविण्यात आले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १९७ तर मृत्यूची संख्या ६ झाली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाने केलेले प्रयत्न आता दिसून येत आहेत. मागील पाच दिवसांत दुसऱ्यांदा दैनंदिन मृत्यूची संख्या १०च्या खाली आली आहे. शिवाय, मागील तीन दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या २००च्या आत आहे. नागपूर जिल्ह्यात आज १०,०१३ चाचण्या झाल्या. यातून १.९६ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात ७२४४ चाचण्यांमधून १.६९ टक्के तर ग्रामीणमध्ये २७६९ चाचण्यांमधून २.५६ टक्के रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अडीच पट, ४७१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ४,६२,३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरात ५२६३ तर ग्रामीणमध्ये २२९७ रुग्णांचे बळी
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा या १५ महिन्याच्या कालावधीत शहरात ५२६३ तर ग्रामीणमध्ये २२९७ रुग्णांचे बळी गेले आहेत. शहरात आतापर्यंत ३,३१,६७९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ३,२४,१६५ रुग्ण बरे झाले आहेत. ग्रामीणमध्ये १,४२,३४६ बाधित रुग्णांची नोंद झाली असून यातील १,३८,१८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात सध्या कोरोनाचे २८३७ तर ग्रामीणमध्ये १४५८ रुग्ण उपचार घेत आहेत.
रुग्णसंख्येत ४२ टक्क्यांनी घट
नागपूर जिल्ह्यात २३ ते २९ मे या आठवड्यात ३,९१२ रुग्ण व १३५ मृत्यूची नोंद झाली. तर ३० मे ते ५ जून या आठवड्यात १६६७ रुग्ण व ७० मृत्यू झाले. एकूणच रुग्णसंख्येत ४२ टक्क्यांनी तर मृत्यूसंख्येत ५१ टक्क्यांनी घट आली.
अशी ओसरली रुग्ण व मृत्यूची संख्या
३० मे : ३५७ रुग्ण : १३ मृत्यू
३१ मे : ३१९ रुग्ण : १० मृत्यू
१ जून : २०३ रुग्ण : १२ मृत्यू
२ जून : २०४ रुग्ण : ११ मृत्यू
३ जून : १९० रुग्ण : ८ मृत्यू
४ जून : १९७ रुग्ण : १० मृत्यू
५ जून : १९७ रुग्ण : ६ मृत्यू