CoronaVirus News: 'एफआयआर रद्द करतो, त्याआधी कोरोना निधीत ५००० जमा करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 05:06 AM2020-06-18T05:06:35+5:302020-06-18T06:53:18+5:30
मुख्यमंत्री मदत निधी(कोविड-१९)मध्ये पाच हजार रुपये जमा करण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने फिर्यादी कमलेश महादेव आत्राम यांना दिला
नागपूर : अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री मदत निधी (कोविड-१९) मध्ये पाच हजार रुपये जमा करण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने फिर्यादी कमलेश महादेव आत्राम यांना दिला. यासाठी आत्राम यांना चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला. तसेच, ही रक्कम जमा न केल्यास एफआयआर कायम राहील व आत्राम यांची याचिका आपोआप खारीज होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
प्रकरणावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आत्राम यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर येथील रामनगर पोलिसांनी २४ एप्रिल २०१९ रोजी सदर एफआयआर नोंदवला होता. त्याचा तपास प्रलंबित असताना आत्राम यांनी आरोपीसोबत तडजोड केली व सहमतीने वाद संपवला. त्यानंतर त्यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता एफआयआर रद्द करण्याचा निर्णय दिला. परंतु, त्यासाठी आत्राम यांना मुख्यमंत्री कोरोना मदत निधीमध्ये पाच हजार रुपये जमा करण्याचे निर्देश देऊन पावती सादर करण्यास सांगितले. या एफआयआरचा तपास करण्यासाठी पोलिसांना त्यांचा किमती वेळ द्यावा लागला. याकरिता, आत्राम यांना हा दणका देण्यात आला.