CoronaVirus News: नागपुरात कोव्हॅक्सिनचा दुसरा टप्पा सुरू; ५० व्यक्तींना दिली लस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 12:19 AM2020-09-12T00:19:11+5:302020-09-12T07:07:22+5:30
८ मुलांचा व २२ महिलांचा समावेश
नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा नागपुरात सुरू झाला. यात १२ ते ६५ वयोगटातील ५० व्यक्तींना ही लस देण्यात आली. यात १२ ते १८ वयोगटातील ८ मुले असून ६० ते ६५ वयोगटातील ५ ज्येष्ठ , शिवाय २२ महिलांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात ५५ व्यक्तींना लस देण्यात आली होती. कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. त्यामुळे दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. २८ ते ३१ जुलै या कालावधीत पहिला डोस देण्यात आला. ११ ते १४ आॅगस्ट दरम्यान दुसरा डोस देण्यात आला. लसीच्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी १४, २८ व ४२ दिवसानंतर संबंधित व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले, अशी माहिती डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली.
कोव्हॅक्सिन लशीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देशातील के वळ ८ केंद्रांची निवड करण्यात आली. यात पुन्हा गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला. या हॉस्पिटलचे संचालक डॉ. गिल्लूरकर म्हणाले, पहिल्या टप्प्यात संपूर्ण देशातून ७५० व्यक्तींना लस देण्यात आली होती. परंतु वाढता प्रादुर्भाव पाहता दुसºया टप्प्यात ही संख्या कमी करून ३८० वर आणण्यात आली. त्यानुसार गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये ७५ व्यक्तींची तपासणी केली. यात १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तर ८ व्यक्तींना कोरोना होऊन गेल्याचे दिसून आले. उर्वरित ५० व्यक्तींची मानवी चाचणीसाठी निवड करण्यात आली. मागील तीन दिवसांत त्यांना कोव्हॅक्सिनची लस देण्यात आली.