CoronaVirus in Ngpur :नागपुरातील 'तो' रुग्ण पॉझिटिव्ह : बाधितांची संख्या १७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 08:28 PM2020-04-04T20:28:21+5:302020-04-04T21:26:02+5:30
नवी दिल्लीहून नागपुरात आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या नमुन्याच्या अहवालावरून आज शनिवारी स्पष्ट झाले. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या १७ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवी दिल्लीहून नागपुरात आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या नमुन्याच्या अहवालावरून आज शनिवारी स्पष्ट झाले. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या १७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे नागपूर ‘एम्स’ने आजपासून सुरू केलेल्या पहिल्याच तपासणीत हा रुग्ण पॉझिटिव्ह आला.
दुसरीकडे निजामुद्दीन तबलिगी मरकज हे कोरोना प्रसाराचे केंद्र बनले आहे. येथून सुमारे २००वर व्यक्ती नागपुरात आल्याचे सांगण्यात येते. १ एप्रिलपासून या सर्व संशयितांना आमदार निवास, वनामती व रविभवन येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे, शुक्रवारी आणि शनिवारी मरकजहून आलेल्या ७५ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. परंतु दिल्लीहून आलेल्या ३२ वर्षीय युवकाचे नमुने पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली. हा १३ दिल्ली येथे गेला होता आणि दुसºयाच दिवशी म्हणजे १४ मार्चला रेल्वेने नागपुरात परत आला. त्याला १ एप्रिल रोजी वनामती येथे क्वारंटाईन करण्यात आले. नमुना पॉझिटिव्ह येताच रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या १८ दिवसात बाधित रुग्ण कुठे कुठे गेला याची माहिती घेतली जात आहे. संपर्कात आलेल्यांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले जाणार आहे.
एम्स’ची प्रयोगशाळा रुग्णसेवेत
मेयोतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र शुक्रवारी अचानक बंद पडल्याने प्रशासनासमोर संकट उभे ठाकले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तातडीने सूत्रे हलविली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनीही यात पुढाकार दाखविला. यामुळे रातोरात प्रयोगशाळा सुरू झाली. शनिवारी एम्सने पहिल्या टप्प्यात २८ नमुन्यांची तपासणी केली असता १ पॉझिटिव्ह तर २७ नमुने निगेटिव्ह आले.