Coronavirus; आता गुळणीतूनही होऊ शकेल कोरोना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 12:19 PM2021-05-20T12:19:18+5:302021-05-20T12:22:05+5:30
Nagpur News साध्या गुळणीच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करणे आता शक्य झाले आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी)ने कोरोना टेस्टिंगसंदर्भात एक मोठे संशोधन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घशावाटे किंवा नाकावाटे स्वॅब घेऊन कोरोना आजाराची चाचणी करणे बहुतेकांसाठी मनस्ताप देणारे ठरते. मात्र यापुढे हा त्रास सहन करावा लागणार नाही. साध्या गुळणीच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करणे आता शक्य झाले आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी)ने कोरोना टेस्टिंगसंदर्भात एक मोठे संशोधन केले आहे. या पद्धतीला 'सलाईन गारगल आरटी-पीसीआर टेस्ट' असे नाव देण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे आयसीएमआरने या संशोधनाला मान्यता दिली. नागपुरातूनच या टेस्टिंग पद्धतीला सुरुवात होणार असून पुढे देशभर त्याचा वापर केला जाईल.
नाकावाटे स्वॅब घेताना अनेकांना नाकावाटे व घशावाटे नमुने देताना इजा झाल्याच्या घटना पुढे आल्या होत्या. अनेकांना नमुने देताना हायपर टेन्शनचा त्रास होत असल्याचेही समोर आले. सध्या आरटीपीसीआर चाचणीसाठी नाकावाटे किंवा घशातून स्वॅब घेऊन रासायनिक द्रव्य असलेल्या ट्यूबमध्ये टाकला जातो. प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर वेगवेगळ्या प्रक्रिया होतात. स्वॅबमधील विविध कणांमधून आरएनए वेगळा केला जातो. तो आरएनए कशाचा आहे, यावरून कोरोना झाला आहे की नाही, हे लक्षात येते. त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. त्यानंतरही चाचणी पूर्ण व्हायला चार तास लागतात.
आता हा त्रास कमी होणार आहे. नीरीच्या व्हायरॉलॉजी विभागाचे डॉ. कृष्णा खैरनार यांनी हे नवे तंत्र विकसित केले आहे. कोरोना टेस्टिंगसंदर्भात हे संशोधन उपयुक्त मानले जात आहे. या टेस्टिंग प्रक्रियेत आरएनए एक्स्ट्रॅक्शनची गरज संपणार असून कमी वेळात कोरोना अहवाल प्राप्त होणे शक्य होणार असल्याचा दावा डॉ. खैरनार यांनी व्यक्त केला.
आयसीएमआरच्या मान्यतेमुळे नागपुरात ही प्रक्रिया सुरू होणार असून शहरातील प्रयोगशाळांना याबाबत माहिती व मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्याची गरज पडणार नाही. केवळ संबंधित व्यक्तीने सलाईन वॉटरच्या १५ मिनिटे गुळण्या करून ते नमुने प्रयोगशाळेत देता येईल. पाण्याची घनता हवेपेक्षा ८०० पट अधिक असते. सलाईनच्या पाण्याच्या गुळण्यामुळे विषाणू त्यामध्ये येईल व त्याला सहजतेने ट्रेस करता येईल.
असे होतील फायदे
- नाकावाटे व घशावाटे स्वॅब घेताना होणारा त्रास कमी होईल.
- प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्याची गरज पडणार नाही.
- सलाईन वॉटरने घरी गुळण्या करून ते सॅम्पल प्रयोगशाळेत देता येईल.
- तपासणीसाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे गदीर्ही टाळता येणार आहे.
- कोरोनाचा अहवाल कमी वेळात प्राप्त करणे शक्य होईल.
- नमुने गोळा करताना होणारा वैद्यकीय कचरा कमी होईल.