Coronavirus: आदिवासी अन् गरीब रुग्णांसाठी सुरू केली ऑक्सिजन बँक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:27 AM2021-05-28T10:27:02+5:302021-05-28T13:08:49+5:30
Oxygen Bank: संकटाच्या काळात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य कार्यालय अधीक्षक खुशरु पोचा यांनी विदर्भातील मागास भागातील आदिवासी आणि शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन बँक सुरू केली आहे.
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. अशा संकटाच्या काळात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य कार्यालय अधीक्षक खुशरु पोचा यांनी विदर्भातील मागास भागातील आदिवासी आणि शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन बँक सुरू केली आहे. सध्या त्यांच्या ऑक्सिजन बँकेत ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध असून, त्याचा फायदा आदिवासी, गरीब रुग्णांना होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे पाहून खुशरु पोचा यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सोशल मीडिया, धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यात त्यांना यश आले. त्यांना अबूधाबी येथून पारसी नागरिकांनी विमानाने ४० तुर्की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले. तर एका १७ वर्षाच्या मुलाने आणि ३ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पोचा यांच्याकडे २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पोहोचविले.
यातील ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पांढरकवडा येथे, ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मेळघाटला पाठविले, तर नागपुरातील ४ गरीब रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आतापर्यंत पुरविले आहेत. शेतकरी नेता किशोर तिवारी यांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींना ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले आहेत, तसेच इतर शहरातील गरीब रुग्णांना ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवीत आहेत. गरीब रुग्ण ऑक्सिजन बँकेतून घेतलेले कॉन्सन्ट्रेटर वापरनंतर पुन्हा ऑक्सिजन बँकेत जमा करीत आहेत. आता चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा येथील आदिवासी भागात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी पाहता, आणखी ६० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
खुशरु पोचा केवळ ऑक्सिजनचा पुरवठाच ते करीत नसून पहिल्या लॉकडाऊनपासून एक हजार स्वयंसेवकांद्वारे सेवा किचनच्या माध्यमातून त्यांनी ५० लाख रुपयांचे भोजनही वितरित केले आहे.
रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक, मुख्यमंत्र्यांनी केला फोन
लॉकडाऊनमध्ये गरजूंना भोजन पुरविण्याच्या तसेच गरीब आणि आदिवासी रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्याच्या खुशरु पोचा यांच्या महान कार्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कौतुक केले. रेल्वेमंत्र्यांनी ट्विट करून पोचा करीत असलेले कार्य इतरांना प्रेरणा देणारे असल्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून ते करीत असलेल्या समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.