CoronaVirus News: पीपीई किट्स धुवून २० वेळा वापरणे शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:19 AM2020-06-17T04:19:16+5:302020-06-17T06:59:25+5:30
महात्मा गांधी मेडिकल कॉलेजचे संशोधन
- सुमेध वाघमारे
नागपूर : सेवाग्रामच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने पीपीई किट अधिक वेळा कसे वापरता येईल, यावर उपाय शोधून काढला. या विभागाचे डॉ. राहुल नारंग यांनी अशा पीपीई किट तयार केल्या, त्या २० वेळा धुवून पुन्हा वापरता येतात. महत्त्वाचे म्हणजे त्याची किंमत बाजारभावाच्या तुलनेत तिपटीने कमी आहे.
किटच्या कापडाच्या संदर्भात थेट ‘डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’शी (डीआरडीओ) संपर्क साधला. वारंवार धुवून आणि निर्जंतुकीकरण करून वापरता येईल, अशा कापडाची माहिती करून घेतली. गुजरातवरून हे खास कापड बोलवून घेतले. या कापडावर चाचण्या करून घेतल्या, असे डॉ. नारंग म्हणाले.
उष्णता कमी करण्यासाठी खादीची बंडी
डॉ. नारंग म्हणाले, पीपीई घातल्यानंतर उष्णतेचा फार त्रास होतो. यासाठी खादीची साधी बंडी वापरण्याची कल्पना समोर आली. या बंडीवर ही किट घातल्यास घाम शोषला जाऊन उष्णतेचा त्रास कमी होतो. ‘फेस चेंज मटेरियल’ कित्येक तास थंड राहू शकते. ही किट तयार करायला २५० रुपये खर्च आला.