Coronavirus : क्वारंटाइन महिला यूपीत पळून गेली, पोलीस आणि प्रशासनाला चुकविले, सर्वत्र प्रचंड खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:31 AM2020-03-24T01:31:06+5:302020-03-24T06:11:42+5:30
coronavirus : सूत्रांच्या माहिती नुसार, 35 वर्षीय ही महिला सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तिचे माहेर उत्तर प्रदेश मध्ये आहे. ती 15 मार्चला शारजाह येथून नागपुरात परत आली होती.
- नरेश डोंगरे
नागपूर : नागपुरात होम क्वारंटाइन केलेली संशयित कोरोना बाधित महिला उत्तर प्रदेशात पळून गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार, 35 वर्षीय ही महिला सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तिचे माहेर उत्तर प्रदेश मध्ये आहे. ती 15 मार्चला शारजाह येथून नागपुरात परत आली होती. तिला होम क्वारंटाइन करण्यात आले होते.
घराबाहेर पडायचे नाही, कुणाच्या संपर्कात यायचे नाही, अशी स्पष्ट ताकीद वजा सूचना या महिलेला देण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून,सगळ्यांना चुकवुन ही महिला घरून निघून गेल्याचे सोमवारी पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस प्रशासन -जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी तिची सर्वत्र शोधाशोध केली. नातेवाईकांकडे विचारणा केली असता ही महिला उत्तर प्रदेशात निघून गेल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशात या महिलेचे माहेर असल्याचीही माहिती पुढे आली. कोरोना बाधित असल्याचा संशय असलेली ही महिला पोलिस आणि प्रशासनाला भूल देऊन उत्तर प्रदेशात निघून गेल्याचे वृत्त कळताच सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती ती जिल्हा आरोग्य प्रशासनाला कळविली त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारशीही संपर्क साधण्यात आला. या महिलेने स्वतः सोबतच अनेकांच्या आरोग्याशी खेळ मांडलाचे उघड झाल्यामुळे सोनेगाव पोलिसांनी या महिलेविरुद्ध रात्री गुन्हा दाखल केला. यासंबंधाने वारंवार माहिती विचारूनही विस्तृत माहिती पोलीसांकडून कळू शकली नाही मात्र या महिलेचा पती खाडी देशात नोकरी करतो ती त्याच्याकडे गेली होती आणि तेथून 15 मार्चला ती नागपुरात परतली विमानतळावर तिची तपासणी केल्यानंतर तिला होम क्वारंटाइन करण्याचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार सदर महिलेला तिच्या घरीच राहण्याची ताकीद देऊन प्रशासन मोकळे झाले, कोरोनाने महाराष्ट्रात सर्वत्र दहशत निर्माण केली असताना खबरदारी चा उपाय म्हणून या महिलेवर किमान व्हिडिओ कॉल करून लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर होती. परंतु या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याने महिलेला संधी मिळाली आणि ती अत्यंत बेजबाबदार पणाचा परिचय देऊन उत्तरप्रदेशात पळून गेली, तिला सोबत कोणी नेले, ती वाहनाने गेली की ट्रेन ने गेली की आणखी कोणत्या साधनांनी ते स्पष्ट होऊ शकले नाही.