Coronavirus: धक्कादायक! दुबईतून आलेल्या प्रवाशांची तपासणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 09:07 PM2020-03-12T21:07:53+5:302020-03-12T21:08:56+5:30
जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’चा शिरकाव उपराजधानीतदेखील झाला असून संपूर्ण यंत्रणा ‘मिशन मोड’वर गेली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे आवश्यक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’चा शिरकाव उपराजधानीतदेखील झाला असून संपूर्ण यंत्रणा ‘मिशन मोड’वर गेली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे आवश्यक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबईहून आलेल्या काही प्रवाशांची मुंबई विमानतळावर जुजबी तपासणी झाली परंतु नागपूर विमानतळावर तर त्यांना साधी विचारणादेखील झाली नाही. खुद्द प्रवाशांनादेखील ही बाब खटकली व सामाजिक भान जपत त्यांनी स्वत: आरोग्य यंत्रणेशी संपर्क केला.
नागपुरातील काही प्रवासी दुबई येथे फिरायला गेले होते. यात ‘लोकमत’चे वाचक असलेल्या एका व्यक्तीचादेखील समावेश होता. मुंबईहून शारजा विमानतळावर पोहोचल्यावर त्यांची कुठलीही तपासणी झाली नाही. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ‘मास्क’ व ‘सॅनिटायझर’चा उपयोग केला. दोन दिवसांअगोदर हे सर्व लोक मुंबईमागे नागपुरात परतले. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रामुख्याने सिंगापूर, इटली, हॉंगकॉंग, चीन इत्यादी देशांतून येणाऱ्या प्रवाशांचीच सखोल तपासणी होत होती. संयुक्त अरब आमिरातीहून आलेल्या प्रवाशांची जुजबी तपासणी झाली.
त्यानंतर पुढील विमान पकडून हे सर्व जण नागपूरकडे निघाले. नागपूर विमानतळावर त्यांना साधी विचारणादेखील झाली नाही. आम्ही नागपूर विमानतळावर उतरल्यावर वैद्यकीय तज्ज्ञांचे ‘युनिट’ आम्हाला तपासायलादेखील आले नाही. आम्ही सर्व जण दुबईहून आलो होतो. त्यामुळे तपासणी होईल असे वाटले होते. परंतु असे काहीही झाले नाही, असे संबंधित व्यक्तीने कुठलीही ओळख न छापण्याच्या अटीवर सांगितले.
आरोग्य यंत्रणेशी स्वत:च केला संपर्क
पुणे येथे दुबईहून आलेल्या प्रवाशांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे समोर आल्याने आम्हीदेखील हादरलो होतो. नागपूर विमानतळावर आमची सखोल तपासणी न झाल्याने आम्ही स्वत:च आरोग्य यंत्रणेशी संपर्क केला. मात्र जर तुमच्यात काही लक्षणे आढळत असतील तरच नमुने द्यायला या, असे सांगण्यात आले. पुढील सात दिवस कुणाशीही संपर्क न ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या कालावधीत ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्वरित संपर्क करण्यास सांगण्यात आले असल्याचे संबंधित व्यक्तीने ‘लोकमत’ला सांगितले.
‘डोमेस्टिक’ प्रवाशांची तपासणी का नाही?
नागपूर विमानतळावर केवळ आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाºया प्रवाशांची तपासणी होत आहे. परदेशातून येणारे नागपुरातील प्रवासी अगोदर मुंबई किंवा दिल्ली येथे उतरतात व तेथून विमानाने नागपुरात येतात. एखाद्या प्रवासी मुंबई, दिल्ली विमानतळावर ‘कोरोना’ बाधित व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाची नागपूर विमानतळावर सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. प्रवासी तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.