coronavirus; नागपुरातील मेयो व मेडिकलमध्ये ‘पीपीई’ किटचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:10 PM2020-03-17T12:10:07+5:302020-03-17T12:12:08+5:30
प्राप्त माहितीनुसार, मेयो, मेडिकलने वैद्यकीय शिक्षण विभागाला या किटची मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचीलागण झालेल्या रुग्णांची संख्या सध्या स्थिर आहे. परंतु संशयित रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. या रुग्णांना सेवा देणाऱ्यांसाठी ‘पीपीई’ म्हणजे ‘पसर्नल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ किट गरज असते. परंतु मागणीच्या तुलनेत फारच कमी पुरवठा होत आहे. प्राप्त माहितीनुसार, मेयो, मेडिकलने वैद्यकीय शिक्षण विभागाला या किटची मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत. स्थानिक पुरवठादाराकडे हजार किटची मागणी केली असता त्यांच्याकडून केवळ १०० किट मिळाल्या आहेत. यामुळे अचानक रुग्ण वाढल्यास रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) कोरोनाबाधित रुग्णांसाठी २० खाटांचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. सध्या येते एक पॉझिटिव्ह तर पाच संशयित रुग्ण आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४० खाटांचा वॉर्ड आहे. येथे तीन पॉझिटिव्ह तर १० संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना किंवा वॉर्डात काम करणाऱ्या डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांना ‘पीपीई’ किट घालणे आवश्यक असते, अन्यथा त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. मेयो, मेडिकलने स्थानिक पुरवठादाराकडून या किटची खरेदी केली आहे. परंतु पुरेशा प्रमाणात त्यांच्याकडेही उपलब्ध नसल्याने मोजक्याच मिळाल्या आहेत. यातच एक किटची किमत दीड हजाराच्या घरात आहे. यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात खरेदी करणेही रुग्णालयांना शक्य नाही. यासाठी आठवड्यापूर्वी दोन्ही रुग्णालयांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला हाफकिन कंपनीकडून किट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्यापही किट मिळालेल्या नाहीत.
अशी आहे किट
‘पसर्नल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ किटमध्ये संपूर्ण शरीर झाकले जाईल असा गाऊन असतो. सोबत शू कव्हर, डोक्यासाठी कॅप, तोंडावर लावण्याचे मास्क, सुरक्षित गॉगल आणि हॅन्डग्लोव्हज असतात. एका किटची किंमत सुमारे दीड हजाराच्या घरात आहे.
रोज लागतात १५ वर किट
मेयो, मेडिकलमध्ये तीन शिफ्टमध्ये एक डॉक्टर, एक परिचारिका व एक कर्मचाऱ्यांची चमू असते. यामुळे २४ तासासाठी कमीत कमी नऊ किटच गरज पडते. यातच वरिष्ठ डॉक्टर किंवा इतरांची सेवा घ्यायची असल्यास त्यांनाही ही किट उपलब्ध करून द्यावी लागते. यामुळे रोज १५ वर किट लागत आहेत. एकदा वापरलेली किट पुन्हा वापरता येत नाही.