कोरोनावरील लसीसाठी करावी लागणार १२ ते १५ महिन्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 10:15 AM2020-07-07T10:15:05+5:302020-07-07T10:17:18+5:30
कोरोनावरील लसीसाठी किमान १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष व श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा मानवी चाचणीसाठी नागपूरसह देशाच्य १२ सेंटरला परवानगी मिळाली आहे. ‘आयसीएमआर’च्या व्हायरल झालेल्या पत्रानुसार १५ ऑगस्टपूर्वी ही लस तयार करण्याची सूचना आहे. मात्र, सध्या ज्या स्तरावर लसीचे कार्य सुरू आहे त्यानुसार किमान १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष व श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
जगभरात कोरोनावरील लसनिर्मितीच्या अनुषंगाने डॉ. अरबट यांनी सुरू असलेल्या प्रयोगांचा आढावा घेतला. ते म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेनुसार सध्या कोरोनाची लसनिर्मितीसाठीचे १३ प्रयोग मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. मॉडर्न इनकॉर्पोरेशन (दुसरा टप्पा), चीनची सिनोवॅक बायोटेक (दुसरा टप्पा), यूकेची ऑक्सफोर्ड झेनेका (दुसरा/तिसरा टप्पा), फायजर बेनटेक (दुसरा टप्पा) आणि अन्य काही लसनिर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. कोरोना लसनिर्मितीचे हे १३ प्रयोग जर यशस्वी ठरले त्यांना नोव्हेंबर २०२० पर्यंत मान्यता मिळू शकते. मात्र, मोठ्याा प्रमाणात लसनिर्मिती आणि सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी त्याची पुरवठा साखळी (सप्लाय चेन) तयार करण्याचा वेळ बघता, पुढील वर्षीच ही लस बाजारात येऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटनेची सॉलिडेरिटी ट्रायल, यूकेची रिकव्हरी ट्रायल आणि अमेरिकेची ऑपरेशन वार्प स्पीड या अग्रगण्य चाचण्या आहेत.
‘आयसीएमआर’च्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने कोरोनावरील प्रतिबंधात्मक ‘कोव्हॅक्सिन’ तयार करण्यात येत आहे. ही इनअॅक्टिव्हेटेड (निष्क्रिय) विषाणू प्रकाराची लस आहे. कोविड १९ विषाणूच्या व्हायरसच्या मृत पेशींपासून तयार करण्यात येत आहे. सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने लसीच्या मानवी चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आहे. त्यावरून असे सांगता येईल की, १५ ऑगस्ट २०२० पर्यंत लस सामान्य व्यक्तींसाठी वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या संशोधनानंतर उपलब्ध करून देणे शक्य नाही.
लसनिर्मिती चाचणीचे विविध टप्पे प्राण्यांवर चाचणी
लसीच्या उपयुक्ततेची आणि परिणामांची चाचणी उंदीर आणि माकड या प्राण्यांवर करण्यात येते. पहिला टप्पा : २० ते ८० मनुष्यांवर चाचणी करून लसीची सुरक्षा आणि प्रतिकारकशक्ती बघण्यात येते. दुसरा टप्पा : माणसाच्या मोठ्या चमूवर वयोगटानुसार चाचणी सुरक्षा, लसीची मात्रा आणि त्याला कशाप्रकारे द्यायचे याचे मूल्यांकन करणे. तिसरा टप्पा : दुसºया टप्प्यात दुष्परिणाम नसेल तर हजारोंच्या संख्येत मानवी चाचणी करतात. एका गटाला प्रत्यक्ष लस तर दुसºया गटाला प्लासेबो देऊन तुलनात्मक अभ्यास करतात. लसीला मान्यता : तिसºया टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली की लसीचे नियमन करणाºया शासकीय संस्थेची मान्यता मिळविणे. त्यानंतर त्याचे वितरण व सामान्य लोकांसाठी उपलब्ध केली जाते.