CoronaVirus in Vidarbha : विदर्भात कोरोना बाधितांची संख्या १० : गोंदियात युवकाला लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 08:36 PM2020-03-27T20:36:12+5:302020-03-27T20:37:35+5:30
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या आता १० झाली आहे. गोंदिया मेडिकलमध्ये संशयित म्हणून भरती असलेल्या २३ वर्षीय युवकाचे नमुने शुक्रवारी पहाटे पॉझिटिव्ह आले.या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोंदिया मेडिकलमध्ये संशयित म्हणून भरती असलेल्या २३ वर्षीय युवकाचे नमुने शुक्रवारी पहाटे पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे, या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले आहे. या रुग्णासह विदर्भात कोरोना बाधितांची संख्या आता १० झाली आहे. नागपुरात गुरुवारी कोरोनामुक्त झालेला एका रुग्णाला घरी सोडले असताना त्याचवेळी आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. नागपुरात आता पाच, यवतमाळ जिल्ह्यात चार तर गोंदिया जिल्ह्यात एक अशी रुग्णांची संख्या झाली आहे. लोकांनी खबरदारी न घेतल्यास ही संख्या वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहे. प्राप्त माहितीनुसार, गोंदियातील रहिवासी असलेला २३ वर्षीय युवक थायलंडला गेला होता. आठवड्यापूर्वी नागपूरमार्गे गोंदियाला पोहचला. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्याला सर्दी, खोकला व तापाचे लक्षण आढळून आले. एका खासगी इस्पितळात उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी नमुने तपासण्यासाठी गोंदिया मेडिकलमध्ये पाठविले. आज त्याचे नमुने पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरामध्ये सर्दी, खोकल्याचा त्रास वाढल्याने संशयित म्हणून त्यांचेही नमुने पाठविण्यात आले.
गोंदिया मेडिकलमध्ये अल्प मनुष्यबळ
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) गोंदिया मेडिकलमधील अल्प मनुष्यबळ व अपुऱ्या सोयींवर नुकतेच ताशेरे ओढले आहेत. यावर उपाय म्हणून नागपूर मेडिकलमधील २१ तर मेयोमधील एका अध्यापकाची तात्पुरती नेमणूक गोंदिया मेडिकलमध्ये करण्यात आली. या डॉक्टरांनी नियुक्तीपत्र तर घेतले परंतु कोणी रुजूच झाले नाही. विशेष म्हणजे, ते गोंदियाचे नाव पुढे करून मेयो, मेडिकलमध्येही सेवा देत नसल्याचे बोलले जात आहे. आता गोंदियातच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने व इतरांनाही लागण होण्याची शक्यता असल्याने शासन आतातरी मनुष्यबळ देईल का, असा प्रश्न गोंदियावासीयांंनी उपस्थित केला आहे.