CoronaVirus in Vidarbha : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या १४६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:27 PM2020-04-21T23:27:25+5:302020-04-21T23:28:54+5:30
विदर्भातील रुग्णांची संख्या १४६ वर पोहोचली आहे. एम्सने तपासलेल्या नमुन्यात यवतमाळ जिल्ह्यातील १० तर अमरावती जिल्ह्याचा १ नमुना निगेटिव्ह आला आहे.
लकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणू लागण झालेल्या रुग्णांची संख्या नागपुरात १०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. नागपुरात मंगळवारी सहा महिलेसह दोन पुरुष असे आठ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ९० वर पोहोचली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आतापर्यंत सर्वात ज्येष्ठ ७० वर्षीय रुग्णासह एक गर्भवती, दोन व तीन वर्षाच्या चिमुकल्याची नोंद झाली. या रुग्णासह विदर्भातील रुग्णांची संख्या १४६ वर पोहोचली आहे. एम्सने तपासलेल्या नमुन्यात यवतमाळ जिल्ह्यातील १० तर अमरावती जिल्ह्याचा १ नमुना निगेटिव्ह आला आहे.
ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकाकडून नागपूरच्या सतरंजीपुऱ्यातील मृत व त्याच्या नातेवाईंकाकडून इतरांना लागण झालेले रुग्ण मंगळवारीही आढळून आले. या आठ रुग्णामधून सहा रुग्ण सतरंजीपुऱ्यातील तर दोन रुग्ण मोमीनपुऱ्यातील आहेत. सतरंजीपुरा संपर्कातील रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे. आणखी १३५ संशयितांच्या नमुन्यांचा तपासणीचा अहवाल प्रलंबित आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे सर्व नमुने तातडीने तपासणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. मेयोच्या प्रयोगशाळेतून आज सात पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये दोन वर्षीय मुलगा, तीन वर्षीय मुलगी व ३१ वर्षीय त्याची आई आहे. सतरंजीपुरात राहणाऱ्या या कुटुंबाला २० एप्रिल रोजी वनामती येथे क्वारंटाइन केले होते. या शिवाय, ७० वर्षीय वृद्ध पुरुष, ६५ वर्षीय महिला हे मोमीनपुऱ्यातील रहिवासी आहे. २० वर्षीय गर्भवती व १७ वर्षीय युवती सतरंजीपुऱ्यातील रहिवासी आहे. एम्स प्रयोगशाळेत ६० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. या सुद्धा सतरंजीपुऱ्यातील असून ८ एप्रिलपासून लोणारा येथे क्वारंटाइन आहेत. यांचा दुसरा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले आहे. एम्सने सायंकाळी एकूण २१ नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील १९, अमरावती व चंद्रपूर जिल्ह्याचा एका नमुन्याचा समावेश होता. यातील यवतमाळ जिल्ह्यातील १० व अमरावतीमधील एक नमुना निगेटिव्ह आला आहे. उर्र्वरित १० नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविले आहेत.