नगरसेवक हरीश ग्वालबन्सीला नाट्यमयरीत्या अटक
By admin | Published: June 30, 2017 02:25 AM2017-06-30T02:25:15+5:302017-06-30T02:25:15+5:30
गुन्हे शाखेकडे केलेली तक्रार परत घे अन्यथा तुझा भूखंड परत मिळणार नाही.
भूखंड बळकावले : मालकाला मारहाण, धमक्या; तक्रार परत घेण्यासाठी दडपण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेकडे केलेली तक्रार परत घे अन्यथा तुझा भूखंड परत मिळणार नाही. तुला जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन भूखंडमालकाला मारहाण करणारा काँग्रेसचा नगरसेवक हरीश ग्वालबन्सी याला गुरुवारी सायंकाळी विशेष तपास पथकाने नाट्यमयरीत्या अटक केली. कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सीच्या टोळीतील म्होरक्यांपैकी एक असलेल्या आणि अनेकांच्या जमिनी हडपून त्यांना खंडणी मागणाऱ्या आरोपीत हरीश ग्वालबन्सीचासुद्धा समावेश आहे.
गिट्टीखदान, काटोल मार्ग, दाभा, झिंगाबाई टाकळी, गोधनी, कोराडी रोड आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दहशत निर्माण करून कुख्यात ग्वालबन्सी टोळीने अक्षरश: जंगलराज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भ्रष्ट महसूल, भूसंपादन विभागातील अधिकारी आणि काही भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरून ग्वालबन्सी टोळीने अनेकांच्या आयुष्यभराच्या कमाईला बळकावले आहे. पोलीस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशा कुणाकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने, अनेकांनी आपल्या जीवाचे बरे-वाईट करून घेतले तर अनेक जण आर्थिक कोंडीमुळे पैशापैशाला मोताद होऊन मरण पावले. तीन दशकांपासून अशाप्रकारे अनेक भूखंड, जमीनमालकांची कोंडी करणाऱ्या ग्वालबन्सी टोळीच्या गुंडांकडून अशीच आर्थिक व मानसिक कोंडी झाल्यामुळे अभियंता भूपेश सोनटक्के याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या बहिणीने तब्बल सहा महिने हे प्रकरण लावून धरल्यामुळे आणि पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी या प्रकरणात कडक भूमिका घेतल्याने ग्वालबन्सी टोळीच्या पापाचा भंडाफोड झाला.
त्यानंतर गेल्या दोन महिन्यात कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी, शैलेष ग्वालबन्सी, गंगाप्रसाद ग्वालबन्सीसह त्यांच्या टोळीतील एक डझनपेक्षा जास्त गुंडांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले. दिलीप आणि त्याच्या साथीदारावर एका प्रकरणात मोक्काही लावण्यात आला. अन्य ग्वालबन्सीसह त्यांच्या टोळीतील अनेक जण मात्र फरार आहेत.
एवढी कडक कारवाई करूनही ग्वालबन्सी आणि त्यांच्या गुंडांकडून याला-त्याला धमकावण्याचे प्रकार सुरूच आहेत.
दाभा भूखंड प्रकरण
दाभा रिंगरोडवरील सोसायटीत संजयसिंग बैस यांनी २००१ मध्ये ७४ आणि ७५ क्रमांकाचे प्रत्येकी १२०० चौरस फुटाचे दोन भूखंड विकत घेतले होते. त्यांनी त्यावर कुंपणही घातले होते. आपले दोन्ही भूखंड सुरक्षित आहेत, असा समज करून बैस यांनी या भूखंडाकडे नंतर लक्ष दिले नाही. काही महिन्यानंतर ते एकदा भूखंडावर गेले असता तेथे त्यांनी केलेले कुंपण उपटून फेकल्याचे दिसले. त्या दोन्ही भूखंडावर नगरसेवक हरीश ग्वालबन्सी आणि त्याच्या गुंडांनी अतिक्रमण केल्याचे लक्षात आल्यामुळे बैस त्याच्याकडे गेले. यावेळी ग्वालबन्सीने खंडणीची मागणी करून त्यांना शिव्या घालून, धमकी देऊन हाकलून लावले. प्रशासन, पोलिसांकडे तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी बैस यांनी जीवाच्या भीतीने गप्प बसणे पसंत केले. दरम्यान, एसआयटीने ग्वालबन्सीविरुद्ध धडक कारवाई केल्यामुळे बैस यांनीही गुन्हे शाखेत तक्रार नोंदविली. त्यानंतर २० जूनला आपल्या भूखंडाचा ताबा घेण्यासाठी बैस आपल्या सहकाऱ्यांसह तेथे गेले. यावेळी आरोपी हरीश ग्वालबन्सी, शैलेष ग्वालबन्सी तसेच त्याच्या गुंडांनी त्यांना शिवीगाळ केली. ‘तू आमच्याविरुद्ध गुन्हे शाखेत तक्रार नोंदविली आहे. ती परत घे. अन्यथा तुला तुझे भूखंड परत मिळणार नाही. उलट तुला जीवाला मुकावे लागेल’, अशी धमकी देऊन हरीश, शैलेष आणि त्याच्या साथीदारांनी बैस यांना मारहाण केली तसेच तेथून हाकलून लावले.
अशी झाली घडामोड
जीवाच्या धाकाने बैस गप्प बसले. मात्र, नातेवाईकांकडून हिंमत मिळाल्यामुळे गुरुवारी सकाळी ते गुन्हे शाखेत पोहोचले. त्यांनी २० जूनच्या प्रकाराची तक्रार नोंदविली. उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी लगेच पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्याशी संपर्क करून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. ग्वालबन्सी टोळीचे गुंड पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे पाहून, वरिष्ठांनी त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हरीश आणि शैलेश ग्वालबन्सीसह पाच जणांवर विशेष तपास पथकाने गुरुवारी सायंकाळी गिट्टीखदान ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांची शोधाशोध सुरू झाली. हरीश हा मध्य प्रदेशातील सुप्रसिद्ध जामसावळीच्या हनुमान मंदिराकडून परत नागपूरकडे येत असल्याचे कॉल लोकेशन ट्रेस झाले. त्यामुळे पोलिसांनी त्या मार्गाकडे धाव घेतली. सायंकाळी हरीश नागपुरात दाखल होताच त्याला अटक केली.