कलेच्या प्रेमापाेटी गलेलठ्ठ पगाराची नोकरी साेडणारा कलंदर, 'थ्री इडियट्स'च्या फरहानसारखी आहे स्टोरी
By आनंद डेकाटे | Published: September 4, 2023 01:59 PM2023-09-04T13:59:38+5:302023-09-04T14:01:48+5:30
कॉर्पोरेट ते कॅनव्हास : एका अभियंत्याचा कलात्मक प्रवास
आनंद डेकाटे
नागपूर : 'थ्री इडियट्स' बघितलाय ना? त्यामधील फरहान आठवतोय का, मोठ्या संस्थेमधून इंजिनिअर होतो पण त्याचे मन फोटोग्राफीमध्ये अडकलेले असते, व्यवहार अन् मनाची आवड या अस्वस्थेतून सुटका करत अखेर तो कलेचा प्रांत निवडतो व मोठा कलावंत होतो....असेच बरचसे साम्य असलेली कथा नागपुरातील अभिजित बहादुरे या अभियंत्याची आहे.
इंजिनिअर असलेले अभिजित हे कॉर्पोरेट क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत होते, त्यांना चित्रकलेची आवड, ते वॉटर कलर आर्टिस्ट आहेत. चांगली नोकरी लागल्यानंतरही त्यांना त्यांचा छंद स्वस्थ बसू देत नव्हता, 'इश्क करता है जानवरों से और शादी करता है मशीनों से अशी मनाची तगमग वाढत होती. याच अस्वस्थेत त्यांनी आठ वर्षे काढली अन् एक दिवस नोकरीला लाथ मारून मशीनसोबत झालेले लग्न मोडून पुन्हा आपल्या कलेशी गाठ बांधली. आता नावारूपालाही आले. अभिजित यांचा कॉर्पोरेट ते कॅनव्हासपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा असून इतरांसाठी आदर्श ठरणारा आहे.
इंजिनिअर असलेले अभिजित हे वॉटर कलर आर्टिस्ट आहेत. चित्रकलेची आवड असल्याने कॉर्पोरेट क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी चित्रकलेलाच आपला व्यवसाय बनवले. अभियंता असलेल्या अभिजितचा कॉर्पोरेट ते कॅनव्हासपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. भगवाननगरला राहणाऱ्या अभिजितचे वडील नरहरी बहादुरे हे कृषी अधिकारी होते. साहजिकच आपला मुलगाही मोठा अधिकारी व्हावा, असे त्यांचे स्वप्न होते. अभिजितसुद्धा अभ्यासात चांगला होता. यासोबतच त्याला चित्रकलेचा छंदही होता. विशेषत: जलरंग त्याचा आवडीचा विषय. मेकॅनिकल स्ट्रीममध्ये अभियांत्रिकीमध्ये त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मार्केटिंगमध्ये (एमबीए) पोस्ट ग्रॅज्युएशन केले. तसेच एचआरचा कोर्स केला. त्याला इंडस्ट्रीयल मार्केटिंगमध्ये कॉर्पोरेट नोकरी मिळाली.
चांगली नोकरी होती. देशविदेशात फिरता येत होते. दरम्यान लग्न झाले. एक मुलगीही झाली. सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु त्याला नेहमीच काहीतरी खटकायचे आणि ते होते त्याची आवडीची चित्रकला. चित्रकलेतच त्याला आत्मिक आनंद अधिक वाटायचा. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात तब्बल ८ वर्षे घालवल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्याने चित्रकलेप्रती पूर्णपणे समर्पित होऊन त्यालाच व्यवसाय म्हणूनही प्रस्थापित केले.
- बसोलीच्या शिबिरातून मिळाली प्रेरणा
अभिजित दहा वर्षांचा असताना उन्हाळी कला शिबिर आयोजित करण्यात आले होते. तिथेच त्याच्या चित्रकलेची सुरुवात झाली. प्रसिद्ध चित्रकार चंद्रकात चन्ने यांच्या बसोली गटाच्या माध्यमातून आयोजित शिबिरात अभिजितने पहिल्यांदा कागदावर जलरंग लावले. यानंतर तो विविध चित्र रंगवू लागला. विविध प्रकारची पेंटिंग्ज काढू लागला. त्यात मास्टरकीही मिळवली.
- सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले बळ
नोकरी करीत असतानाही अभिजित पेंटिंग्ज करायचा. कधी मित्रांना, नातेवाइकांना तो त्या पेंटिंग्ज भेट द्यायचा. खूप कौतुक व्हायचे परंतु हा केवळ छंद राहिला होता. अभिजितने हळूहळू आपले पेंटिंग्ज सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. तेथून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्याची चित्रे चांगल्या किमतीवर खरेदी केली. अनेक तरुणांनी ही कला शिकण्याची इच्छाही दर्शविली. यातून त्याला बळ मिळाले. अभिजितने पेंटिंग्ज शिकवण्याचा स्वत:चा एक कोर्स तयार केला आणि तो मुलांना शिकवू लागला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या पेंटिंग्जना देशविदेशातूनही मागणी वाढली आणि कला शिकणारे मुलेही मिळू लागले. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि २०१८ मध्ये अभिजितने नोकरी सोडून चित्रकला हाच पूर्णपणे व्यवसाय म्हणून सुरू केला.
- विविध चित्र प्रदर्शनात सहभाग
अभिजित कुठल्याही फाईन आर्ट महाविद्यालयात शिकला नसला तरी त्याने चित्रकलेचा बारकाईने अभ्यास केला. विशेषत: वॉटर कलर पेंटिंग्जसाठी त्याने त्यासंबंधीचे सर्व पुस्तकांचा अभ्यास केला. त्यातील बारकावे शिकून घेतले. २०२० मध्ये महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठी निधी उभारणीच्या कार्यक्रमासाठी रवींद्र नाट्य मंदिर आर्ट गॅलरी येथे ‘आर्ट फॉर ह्युमॅनिटी’ या कला प्रदर्शनात अभिजितला भाग घेण्याची संधी मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी त्याच्या चित्राची विक्री झाली. यातून त्याचा विश्वास वाढला. इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन वॉटर कलर स्पर्धा २०२० मध्ये रौप्यपदक पटकावले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या भारतीय त्रैमासिक मासिक आयक्यूच्या एप्रिल-जून २०२१ च्या अंकात त्याची नऊ चित्रे प्रदर्शित झाली आहेत. २०२२ आणि २०२३ मध्ये जपान इंटरनॅशनल वॉटर कलर इन्स्टिट्यूट ऑनलाइन प्रदर्शनासाठी अभिजितच्या चित्रांची निवड झाली आहे.