नागपूर जिल्ह्यात काटोलमध्ये नगरसेवकास इराणी गुंडांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:47 AM2018-03-05T10:47:41+5:302018-03-05T10:47:48+5:30
उघड्यावर शौच करणाऱ्या इराणी गुंडास टोकल्याने त्याने त्याच्या साथीदारांसह विद्यमान नगरसेवक व त्यांच्या मित्रास मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उघड्यावर शौच करणाऱ्या इराणी गुंडास टोकल्याने त्याने त्याच्या साथीदारांसह विद्यमान नगरसेवक व त्यांच्या मित्रास मारहाण केली. त्याने फायटरने वार केल्याने नगरसेवक जखमी झाला, शिवाय त्याने नगरसेवकाला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्या गुंडास अटक करण्यात आली आहे. ही घटना काटोल शहरात शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये नगरसेवक किशोर गाढवे (४१) व त्यांचा मित्र उमेश चिंतामण डाखोळे (३२) दोघेही रा. काटोल यांचा समावेश असून, हैदर अक्रम अली (२३), दानिश रहीम शेख (२१) व शब्बीर अली अक्रम अली (२०) तिघेही रा. काटोल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी इराणी गुंडांची नावे आहेत. किशोर गाढवे हे सत्ताधारी विदर्भ माझा पक्षाचे नगरसेवक असून, ते व त्यांचा मित्र उमेश डाखोळे शनिवारी रात्री हनुमान तलाव परिसरात फिरत होते. त्यातच हैदर अक्रम अली हा तलावाच्या पायरीवर शौचास बसला. त्यामुळे किशोर गाढवे यांनी त्याला टोकले.
त्यावर चिडलेल्या हैदर अक्रम अलीने गाढवे यांना शिवीगाळ करीत त्याच्या साथीदाराला बोलावले आणि गाढवे व डाखोळे यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्याने दोघांवर फायटरने वार केल्याने दोघेही जखमी झाले. त्यानंतर गाढवे यांनी रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि ३२४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.
दरम्यान, रविवारी सकाळी या घटनेची माहिती शहरात पसरली. त्यामुळे पालिकेतील गटनेता चरणसिंग ठाकूर, पालिकेचे उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, विरोधी पक्षनेता संदीप वंजारी, नगरसेवक तानाजी थोटे, सुकुमार घोडे, राजू चरडे, माजी उपाध्यक्ष समीर उमप, दिगांबर डोंगरे, प्रहारचे दिनेश निंबाळकर, आशिष जयस्वाल, पिंटू देशमुख, विजय ताटे, सूरज लोही यांच्यासह नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे ठाण्याच्या आवारात तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना काटोल येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.