मनपा : पाच दिवसात २०४० मालमत्ताधारकांना 'अभय'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 09:26 PM2020-12-19T21:26:06+5:302020-12-19T21:29:55+5:30
NMC, Tax recovery, nagpur news १५ ते १८ डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत २०४० मालमत्ताधारकांनी २.१५ कोटींची थकबाकी जमा केली आहे. आर्थिक वर्षाच्या चालू करातून पाच दिवसात ३.८९ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची मालमत्ता कराची ६०० कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे आव्हान मोठे आहे . थकीत कराची वसुली व्हावी, यासाठी मनपा आयुक्तांनी १५ डिसेंबरपासून अभय योजना लागू केली आहे. या योजनेला मालमत्ताधारकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मनपा तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची आशा निर्माण झाली आहे. १५ ते १८ डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत २०४० मालमत्ताधारकांनी २.१५ कोटींची थकबाकी जमा केली आहे. आर्थिक वर्षाच्या चालू करातून पाच दिवसात ३.८९ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा झाले.
अभय योजनेंतर्गत ३१ मार्च २०२० पर्यंत थकीत रकमेसह आर्थिक वर्ष २०२०-२१ चा मालमत्ता कर १५ जानेवारी २०२१ पर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेत ८० सूट मिळेल. तर ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची थकीत मालमत्ता कर १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेवर ५० टक्के सूट दिली जाणार आहे. निर्धारित कालावधीत थकबाकी व चालू वर्षाचा कर जमा केला तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
६७ लाखांचा दंड माफ
अभय योजनेच्या पहिल्या दिवशी १५ डिसेंबरला ४२५ मालमत्ताधारकांनी २७ लाखांची थकबाकी जमा केली. सोबतच चालू वर्षाचा १३.७७ लाखांचा कर जमा केला. १६ डिसेंबरला ४४० थकबाकीदारांनी २९ लाख जमा केले. १७ डिसेंबरला ४६८ थकबाकीदारांनी ३१ लाख जमा केले तर शनिवारपर्यंत एकूण २०४० थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेतला. एकूण २.११ कोटींची थकबाकी जमा केली. ६७ लाख दंड माफ करण्यात आला.
चार दिवसात ६ कोटी वसूल
१५ ते १९ डिसेंबर या पाच दिवसात मालमत्ता कराची थकबाकी व चालू वर्षाच्या बिलाची ६ कोटींची वसुली झाली. यात २.१५ कोटींची जुनी थकबाकी असून ६७ लाखांचा दंड माफ करण्यात आला आहे. थकबाकीदारांना यातून दिलासा मिळाला आहे.
अशी आहेत मालमत्ता व कराची मागणी
मनपा हद्दीतील मालमत्ता -६,३५ ९९५
कर निर्धारण मंजूर मालमत्ता -६०७१५१
चालू आर्थिक वर्षाची मागणी -२५० कोटी
मालमत्ताकराची थकीत रक्कम -६०० कोटी
एकूण मागणी - ८५० कोटी
थकीत रकमेवरील व्याज १५७ कोटी
वसूल झालेली रक्कम -४० कोटी
यात शासकीय मालमत्ताकडील थकीत- १०९ कोटी
थकबाकीदारांचा प्रतिसाद- मेश्राम
आयुक्तांनी जाहीर केलेल्या अभय योजनेला मालमत्ताधारकांचा प्रतिसाद वाढत आहे. पाच दिवसात २०४० थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यांना ६७ लाखांचा दंड माफ करण्यात आला. या योजनेला प्रतिसाद वाढत आहे. पाच दिवसात २.१५ कोटीची थकबाकी वसूल झाल्याची माहिती मनपाचे उपायुक्त (मालमत्ता) मिलिंद मेश्राम यांनी दिली.